Lok Sabha Election 2024 : … तर विधानभवन देखील दिल्लीला नेऊन ठेवतील, आदित्य ठाकरे यांचा इशारा

गेल्या दोन वर्षांत मिंध्यांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे. लाखो रोजगार देणारे वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, मुंबईत होणारी वर्ल्ड कप फायनलदेखील गुजरातला पळवलं. आज जर आपण आपली माणसं दिल्लीत व विधानभवनात पाठवली नाही तर पुढच्या वर्षी ते विधानभवन देखील गुजरातला नेऊन ठेवतील, असा घणाघात शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईतील शिवसेना शाखा भेटी उपक्रमात आदित्य ठाकरे यांनी आज घाटकोपर पूर्व व पश्चिम येथील शाखांना भेटी दिल्या. यावेळी जनसभेला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी मिंधे व भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

”देशातलं राजकारण सध्या बदलत चाललं आहे. राज्यात जास्तित जास्त सीट आपण जिकंणार आहोत. सर्व सर्वेक्षणात तेच दिसतंय. भाजप व मिंध्यांना उमेदवार मिळत नाहीए. कुणी त्यांच्याकडून लढण्याची हिंमत दाखवायला तयार नाही. मनसे ला दिल्लीला बोलवून घेतलं. आता लाज काढतायत की काय करतायत ते कळेल दोन दिवसात. यांना महाराष्ट्र संपवायचा आहे. 2016- 17 पासून ते शिवसेना संपवायचा प्रयत्न करत आहेत. त्या विचारधारेने ते काम करत आहे. शिवसेना संपली तर महाराष्ट्र संपेल. शिवसेना संपली तर महाराष्ट्र तोड़ू शकू. या विचारधारेने भाजप विष पेरत आहे. त्यासाठी आपल्याला भाजपला हरवणं गरजेचं आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव 15 ते 20 मतदारसंघात जिंकतील असे चित्र आहे. आम्ही दोघंही तरुण आमच्या राज्यासाठी लढत आहोत. आमची राज्य लुटली जातायत त्याविरोधात लढत आहोत”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”काही दिवसांपूर्वी मी हेमंत सोरेन यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांना वाटत होतं की त्यांच्या पाच ते सात जागा येतील. त्यानंतर आता त्यांना भाजपने तुरुंगात टाकल्यानंतर तेथील जनता भडकली आहे. तिथे देखील हेमंत सोरेन यांचा पक्ष आता जास्तित जास्त जागा मिळवेल असे वातावरण आहे. बिहारमध्ये आरजेडी, पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींच्या पक्षाला जास्त जागा मिळण्यासारखे वातावरण आहे. दिल्लीत यांनी मुख्यमंत्र्यांना अटक केली. तुरुंगातून मुख्यमंत्री सरकार चालवत आहे. दिल्ली पंजाबमध्ये देखील आप काँग्रेस जिंकतंय असं चित्र आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे हे जाहीरात व बातम्यांमधून सतत चारशे पार जाणार असा दावा करत आहेत. सगळीकडून इंडिया आघाडी जागा जिकंणार असेल तर भाजप दोनशे पार तरी कशी पोहोचेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

”भाजप महाराष्ट्र विरोधी आहे, भाजप महाराष्ट्राला लुटतंय. हे सर्व जनतेला दिसतयं. अशा वेळी लोकं विचारतात की माझ्या एका मताने काय फरक पडणार. तुमचं एक मत जर एकमत झालं तर इतिहास घडवू शकतं. जे बदल परिवर्तन पाहिजे ते घडवू शकतं. एक मताची ताकद खूप मोठी आहे. सगळी मनगटं एकवटली तर प्रत्येक खासदार बदलला जातो. हेच जर बदलायला लागलं. तर मला खात्री आहे. बिहार, बंगाल, दिल्ली, पंजाब हरयाणा, दक्षिण भारतात तसं महाराष्ट्र देखील भाजप विरोधी वातावरण आहे. यावेळी भाजपला अब की बार भाजप तडीपार हे ठासून सांगायचं आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”ही लढाई आपल्या अस्तित्वाची झालेली आहे. अखंड महाराष्ट्र टिकणार की नाही टिकणार, आर्थिक ताकद राहणार का? यावर ही निवडणूक आलेली आहे. दोन अढीच वर्षात बरंच वाटोळं झालेलं आहे. भ्रष्टाचार वरून ते खालपर्यंत झालेला आहे. पीएम केअरचा भ्रष्चाचार खूप मोठा आहे. इलेक्ट्रोल बाँडचा घोटाळा हा जगातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा झालेला आहे. चंदा दो धंदा लो. हेच जे वातावरण पूर्ण देशभरात चाललेल आहे. ते घातक आहे. आम्ही भाजप मिंधे गटाचे भ्रष्टाचार लोकांपर्यंत आणले आहेत. महापालिकेची लूट लोकांपर्यंत आणली. आपण जेव्हा महापालिकेत निवडून गेलो तेव्हा आपण 600 कोटींच्या तोट्यातून आपण महापालिकेला 92 हजार कोटींच्या नफ्यात आणलं. सर्व पैसा मुंबईकरांसाठी वापरला. मिंधे सरकार आलं आणि ओरबाडणं सुरू झालं. आता सर्व गुजरातला नेलं जातंय. भीती ही निर्माण झालीय की मुंबई जी देशाची आर्थिक शक्ती होती ती आता दिल्ली अहमदाबाद सुरतच्या हातात दिली जातेय की काय? रस्ता घोटाळा मी मुंबईकरांसमोर आणला. त्यानंतर त्यांना तो मान्य करावा लागला. त्यानंतर त्यांना त्यातून 1 हजार कोटी कमी करावे लागले. आपलं सरकार आल्यावर त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावर जेवढे वार करायचे आहेत ते करा. यांनी कायम मागून वार केले. मागून खंजीर खुपसला. पण माझ्या महाराष्ट्रावर वार केले तर सहन केला जाणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सुनावले.

मिहीर कोटेचा नव्हे, मिहीर ‘खोटेचा’!

ईशान्य मुंबईत भाजपने उभे केलेले उमेदवार मिहीर कोटेचा खोटारडे असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पालिकेत झालेला 263 कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा आपण बाहेर काढलेला असताना हा घोटाळा आपणच बाहेर काढल्याचे कोटेचा यांनी सांगितले. यावेळी भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी भाजपचे उमेदवारी मिहीर कोटेचा यांचा खोटेपणा देखील उघड केला. ”मिहीर कोटेचा खरं कधी बोलतात खोटं कधी बोलतात तेच कळत नहाी. यांचं आडनाव खोटेचा करायला हवं. आम्ही जेव्हा फर्निचर घोटाळा झाला असं उघड केलं तेव्हा मिहीर कोटेचा यांनी फर्निचर घोटाळा झाल्याचे मान्य करत त्याबाबत एक पत्र लिहलं होते. तेच मिहीर कोटेचा मागच्या वर्षी विधानभवनात खोटं बोलले. हाऊसमध्ये त्यांनी स्ट्रीट फर्निचरचं टेंडर रद्द केल्याचं सांगितलं. ते मंत्री देखील नव्हते मग कोणत्या हक्काने सांगितलंत. आजही ते टेंडर आपल्यामुळे थांबून आहे. मिहीर कोटेचा तुम्ही खोटं का बोललात. अशा खोटं बोलणाऱ्यांना तुम्ही दिल्लीत पाठवणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. त्यामुळे मिहीर कोटेचा नव्हे, ‘मिहीर खोटेचा’ असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.