‘जिथे चिखल होतो तिथे कमळ उगवतं, पण भाजपचे जे कमळ आहे ती एकप्रकारची घाण आहे. ही घाण आपल्याला महाराष्ट्रात नको आहे. जे हक्काचं कमळ आहे, जे देशाचं चिन्ह आहे ते चालेल, असे नमूद करतानाच पाणी गढूळ करणारं भाजपचं कमळ महाराष्ट्रातून हद्दपार करा, असे आवाहन शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात केले.
शिवसेना विभाग क्रमांक 2 च्या वतीने विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त विभाग क्रमांक 1 आणि 2 च्या शिवसेना, युवासेना आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱयांची बैठक मालाड पश्चिम येथील बाल कल्याण केंद्र, सीडब्ल्यूसी कॉलेज येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेना नेते आणि पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ऍड. अनिल परब आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर, माजी आमदार विलास पोतनीस, उपनेते विनोद घोसाळकर, विश्वनाथ नेरुरकर, उपनेत्या संजना घाडी, विभागप्रमुख अजित भंडारी, विभाग संघटक मनाली चौकीदार आदी उपस्थित होते.
हुकूमशहाला 240 वरून 40 वर खेचायचे आहे
भाजपला या देशातील संविधान बदलायचे आहे. महाराष्ट्रातून याची सुरुवात केली होती. मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा महानगरपालिकेत गेल्या दोन-अडीच वर्षांत निवडणुका झालेल्या नाहीत. देशाच्या 75 वर्षांच्या इतिहासात कधी आणि कुठे 40 चोरांना मंत्रीपदे देण्यात आली आहे ते सांगा. त्यांना मंत्री बनवून सरकारमान्यता दिली आहे. हुकूमशहा असलेल्या भाजपला आपण 330 वरून 240 वर आणले आहे. हा धोका अजूनही संपलेला नाही. त्यांना 240 वरून 40 वर खेचायचे आहे, ही शपथ घेऊन आपल्याला पुढे निघायचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सीसीटीव्ही फुटेज देण्याची हिंमत नाही!
जगभरात ईव्हीएम वापरले जात नाही. एलॉन मस्क यांचा तंत्रज्ञानाबद्दल एवढा विश्वास असूनही त्यांना ईव्हीएमबद्दल विश्वास नाही. तुम्ही जर फोनवरून ओटीपीने ईव्हीएम उघडू शकत असाल तर काहीही होऊ शकते. या निवडणुकीत आम्ही एवढेच म्हणतो की, सीसीटीव्ही फुटेज द्या. पण ती हिंमत हे करत नाहीत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो
भाजपमध्ये काहीही ताळमेळ राहिलेला नाही. एक जण 400 पारच्या घोषणेबद्दल बोलतो, तर दुसरे आणखी काही बोलतो. आता निवडणूक होऊन गेली आहे. लोकांनी त्यांना जागा दाखवली. इंडिया आघाडी आज 237 वर तर एनडीए 240 वर आहे. भाजपचे राजकारण हे लोकांवर धाडी टाकण्याचे आणि धमक्या देण्याचे आहे. भाजपमध्ये एकवाक्यता नाही. भाजपची संसदीय समितीची बैठक अद्यापही झालेली नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो, असे सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील नव्याने स्थापन झालेल्या एनडीए सरकारबाबत केले.
भाजपचा राग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर
या देशातील प्रत्येकाला आवाज आहे, मतदानाचा अधिकार आहे. म्हणून भाजपला संविधान बदलून स्वतःचे संविधान लिहायचे आहे. कारण त्यांचा राग हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आहे. भाजपचा राग या देशावर आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजपचा माज महाराष्ट्रात चालणार नाही
ज्या पक्षाने महाराष्ट्राचे राजकारण गढूळ केले, शिवसेना पक्ष फोडला, राष्ट्रवादी फोडली, घर फोडले, ज्या पक्षाला कोळीवाडय़ाचे वासही आवडत नाही, ज्या पक्षाला महाराष्ट्राची ऍलर्जी आहे त्यांना आपण त्यांची जागा दाखवली आहे. तुमचा माज, मस्ती, मुजोरी आणि हुकूमशाही या महाराष्ट्रात चालणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.