ब्रिटिशांपेक्षाही भाजप राजवटीचा चेहरा भयानक – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटिशकाळात जितके अत्याचार झाले त्यापेक्षाही जास्त अत्याचार भाजपच्या राजवटीत काल दिल्लीत झाले. ब्रिटिशांपेक्षाही भाजप राजवटीचा चेहरा भयानक आहे, अशी टीका शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. आपल्या भवितव्याबद्दल चिंतेत असलेली शाळेतली मुले आंदोलनात आली होती. त्यांना पोलिसांकडून कानाखाली मारले गेले. महिलांना पाठीमागून दांडक्याने मारले गेले. रॅपिड अक्शन फोर्सच्या जवानांनी छातीवरच्या नेमप्लेट काढून अमानुष लाठीमार केला. कुणासाठी आंदोलन होतेय याचाही विचार सरकारने केला नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शेतकऱयांनाही याच भाजप सरकारने अर्बन नक्षल, माओवादी म्हणत त्यांच्यावर अश्रुधूर सोडला होता, गोळ्या मारल्या होत्या, याचीही आठवण त्यांनी करून दिली. शिवसेनेचे खासदार जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात भेटायला गेले होते पण त्यांना भेटू दिले नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आधी शेतकरी आता विद्यार्थी दहशतवादी

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱया तरुणांना दहशतवादी म्हणणाऱया आमदार सदाभाऊ खोत यांनाही आदित्य ठाकरे यांनी चपराक लगावली. खोत हे कधीकाळी शेतकऱ्यांसाठी लढायचे, आज स्वार्थासाठी भाजपमध्ये गेलेत, तोच भाजप शेतकऱयांना माओवादी म्हणाला होता, तोच भाजप आणि धर्मेंद्र प्रधान आज विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणालेत, कारण कुणीही शिक्षणाबद्दल बोलू नये असे भाजपला वाटते, असे ताशेरे आदित्य ठाकरे यांनी ओढले.

फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलन हे फेसलेस असून अशा आंदोलनांमध्ये बाहेरच्या शक्ती घुसून अनुचित घटना घडवू शकतात म्हणून पोलिसांना कारवाई करावी लागते असे वक्तव्य केले. त्यालाही आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणला, असा पलटवार त्यांनी केला. फडणवीस यांचा इंटेलिजन्स एवढा फेल होत असेल तर त्यांनी पद सोडायला हवे.