आधी आदिलशाहकडून जॉइनची ऑफर यायची, आता अमित शहांकडून येते; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रचार सभा झाली. दुपारी अडीचच्या सुमारास भर उन्हात आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ ही सभा झाली. या सभेत तुफान गर्दी पाहून आदित्य ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करत विरोधकांवर हल्लाबोल केला. ‘साधारणपणे 43 अंश डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. कुणाला उष्णता वाटतेय का? असा प्रश्न विचारातच गर्दीतून नाही, असं उत्स्फूर्त उत्तर आलं. तापलं इथे पण चटके त्यांना बसताहेत’, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

‘जनतेतून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहाता अजून प्रचार करण्याची गरज राहिली आहे का? कारण संजोग-वाघेरे पाटील यांना जिंकवण्याची जबाबदारी ही आता लोकांनी आणि मावळ मतदारसंघाने घेतलेली आहे. आपण कितीही उन्हात असलो तरी आपले कार्यकर्ते आणि आपल्याला प्रेम करणाऱ्यांना नेहमी सावलीत ठेवलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्राची काळजी आपण पहिली ठेवली पाहिजे. कोविड काळात आपण सगळ्यांनी हेच बघितलं’, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘ह्या निवडणुकीत ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदारच नाही तर, आपण तो इतिहास घडवणारे मतदार आहोत. कारण इतिहास घडणार आहे आणि देशात परिवर्तन होणार आहे, हे लिहून घ्या. भाजप सरकार पुन्हा येत नाही. अनेकदा आपण ऐकलं असेल 400 पार… मात्र आपण जो नारा दिल्लीत दिला होता तो मावळच्या जनतेला माहिती आहे. असं सांगत आदित्य ठाकरे यांनी अब की बार… असं म्हणताच नागरिकांनी ‘तडीपार’ म्हणत जोरदार प्रतिसाद दिला.

‘आज भाजपला खरोरच तडीपार करण्याची गरज आली आहे. चिखलातच कमळ उगतं, असं म्हटलं जातं. त्यावेळी तशी परिस्थिती होती. म्हणून वेगवेगळ्या विषयांवर भाजपसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन केली. त्यावेळी भाजपवाले बाजूला जाऊन बसायचे आणि पोलिसांच्या लाठ्याकाठ्या शिवसैनिकांना खाव्या लागायच्या. फोटो मात्र भाजपवाल्यांचे यायचे. भाजप सरकार 2014 मध्ये सत्तेत बसल्यानंतर चिखल कमी होईल, असं वाटलं होतं. पण भाजप सरकार डोक्यावर बसल्यानंतर चिखल कमी व्हायच्या ऐवजी चिखलफेक सुरू आहे. एकमेकांना चिखल लावत आहेत. दुसऱ्यांवर चिखल फेकतात. चिखल फेकल्यानंतर मग ऑफर येते. आधी आदीलशाहकडून जॉइनची ऑफर यायची, आता अमित शहांकडून येते. ‘जॉइन ऑर जेल’ ही पॉलिसी राबवली जात आहे. म्हणजे तुमच्यावर चिखल आम्ही फेकू. आणि तुमच्यावर फेकलेला चिखल धुवून काढायचा असेल तर, भाजप वॉशिंग पाउडरमध्ये धुवून काढेल’, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

’10 वर्षांत जी राज्ये चांगली चालत होती. तिथे यांनी स्वतःचे मुख्यमंत्री बदलले. कोणीतरी भलतेच आणून बसवलेत. उत्तरपासून दक्षिणेपर्यंत बघितलं तर ज्या राज्यांत जे विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री होते, त्यांना तुरुंगात टाकलं जातंय. दिल्लीत भयानक प्रकार झालेला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. कोणीतरी सांगितलं आम्ही अरविंद केजरीवाल यांना शेकडो कोटी दिले आहेत, आता तुम्ही त्यांना अटक करा. मग ईडी केजरीवाल यांच्या घरी पोहोचली आणि त्यांना ऑफर दिली. एक तर एनडीएमध्ये या किंवा तुम्हाला जेलमध्ये टाकू. जेलमध्ये टाका, फासावर लटकवा पण मी तुमच्या एनडीएमध्ये येणार नाही, असं केजरीवाल यांनी ठणकावून सांगितलं. केजरीवाल लढत आहेत. त्यांचे सहकारी संजय सिंह शूरवीर योद्धा आहेत. संजय सिंह हे जेलमध्ये जाऊन आले. जसं आपल्याकडे संजय राऊत आणि अनिल देशमुख लढले. तसं संजय सिंह हे देशासाठी लढत आहेत. सत्यासाठी लढत आहेत. कारण भाजपची एक पॉलिसी आहे ती म्हणजे ‘सत्तामेव जयते’, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

फडणवीसांच्या मनात अटकेची भीती होती, त्यामुळेच फोडाफोडीचे राजकारण केले; संजय राऊत यांचा हल्लाबोल

‘दिल्लीत जे केलं तसं त्यांनी झारखंडमध्ये केलं. हेमंत सोरेन यांना त्यांनी तुरुंगात टाकलं आहे. तसंच आपलं सरकारही पाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे मिंधे घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आपल्या डोक्यावर आणून बसवले आहेत. अवकाळी सरकार बनून आपल्या डोक्यावर बसलेले आहेत. त्यानाही ऑफर दिली होती जॉइन ऑर जेल. त्यांचं कॅशचं गोडाउन सापडलं होतं. आयकरची धाड पडली होती. त्यांना सांगितलं येताय की आतमध्ये टाकू. मग दाढी खाजवत ते रडायला लागले. मला हे धमकवत आहेत, हे त्यांनी वर्षा बंगल्यावर येऊन उद्धवजींना सागितलं होतं. जेलमध्ये जाण्याचं माझं वय नाहीये. मी काय करू साहेब, हे मला आत टाकतील. भाजपसोबत चला, आम्ही आत जावू. हे सगळं रडगाणं झालेलं’, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला.

‘भाजपचं एक आहे, खोटं बोला पण रेटून बोला. मिंधे गँगची एक पॉलिसी आहे, खोटं बोला पण रडून बोला. इतकाच फरक आहे दोघांमध्ये. दोघंही खोटं बोलत असतात. हे 40 गद्दार आमदार उड्या मारून आधी गुजरात, मग गुवाहाटीला पळाले आणि गोव्यात जाऊन टेबलावर नाचले. या सर्वांविरुद्ध काही ना काही धमक्या होत्या. फाइली होत्या. केसेस होत्या, आरोप होते. तसेच जे गद्दार खासदार गेले त्यात इकडेचेही एक होते. कुठे डांबर चोर, कुठे माती चोर, कुठे कोंबड्या चोरल्या. सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकीचं राहिलं तरी काय? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर निशाणा साधला.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 25 पेक्षा जास्त जागा मिळणार; शरद पवार यांचा विश्वास

भाजप सांगत असेल 400 पार… हे चंद्रावर करत असेल. मात्र हिंदुस्थानात 400 काय 200 पारही भाजप करणार नाही. साउथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ, अशा घोषणा भाजपविरोधात दिल्या जात आहेत. 400 पार… हे सगळं फोल आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सभेला उपस्थित नागरिकांना प्रश्न केला. तुम्ही भाजपला मतदान करणार का? तुम्ही गद्दारांना मतदान करणार आहात का? महाराष्ट्रद्वेष्टींना मतदान करणार आहात का? त्यावर नाही… नाही… नाही… असं उत्तर नागरिकांनी दिलं. म्हणजे मावळची जागा आपली आहे ना? शिरूरची जागा आपली आहे ना? पुण्यातली सीट आपली आहे ना? बारामतीची सीट आपली आहे ना? असं आदित्य ठाकरेंनी विचारलं. यावर हो असा प्रतिसाद नागरिकांनी दिला. मग 400 पार… येतात कुठून? हेच तुम्हाला सांगायला आलोय. खूप वेळा तुम्हाला भ्रमात टाकलं जातं. तुम्ही तुमचं मतदान भाजपला का करताय? कारण तुमचं मत फुकट जाईल. तुमचं मत वाया जाणार नाही. तुमचं एक बोट हे इतिहास घडवणार आहे. केंद्र सरकार बदलणारं तुमचं मत असणार आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.