‘ज्यांनी दिली साथ, त्यांचाच केला घात’ हे मिंधेंचे ब्रीदवाक्य! आदित्य ठाकरे यांचा हल्ला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱया मिंध्यांची अवस्था आता फारच बिकट आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेले 9 पैकी 5 उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे ‘ज्यांनी दिली साथ, त्यांचाच केला घात’ असे मिंधेंचे ब्रीदवाक्य बनले आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.

आदित्य ठाकरे यांनी घाटकोपर येथील पंतनगर आणि भटवाडीमधील शिवसेना शाखांना आज सायंकाळी भेटी देऊन जनसंवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे उत्तर पूर्व मतदारसंघातील उमेदवार संजय दिना पाटील हेसुद्धा होते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मिंध्यांना उमेदवार मिळणे कठीण झाले आहे. कारण पराभवाच्या भीतीने कुणीही त्यांच्यासाठी लढण्यास तयार नाही. त्यांच्यासोबत गुवाहाटीला पळून गेलेल्या खासदारांचाही त्यांनी घात केला आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला म्हणून गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जे जे टेबलावर नाचले त्यांना कुणालाच निवडणुकीचे तिकीट मिळत नाही अशी अवस्था झाली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेनेसोबत भाजपची युती होती तेव्हा जागावाटपात शिवसेनेचा आवाज चालायचा. आता भाजपसमोर मिंध्यांचा आवाज निघत नाही. कारण भाजपने समोर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सला बसवलेय, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. स्वतःच्याच माणसांचा घात करणाऱया मिंध्यांना साथ देणार का, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित लोकांना विचारले असता त्यांनी जोरदार नकार दिला.
राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार हे पत्रकारांच्याच नव्हे, तर भाजपच्या सर्व्हेमध्येही दिसतेय याकडेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले. उत्तर-मध्य मुंबईत भाजपला अद्याप उमेदवार मिळालेला नाही. दक्षिण मुंबईची जागा मनसेला द्यायची की भाजपला असे चालले होते. त्यासाठी मनसेला दिल्लीला बोलवून घेतले तरी अद्याप तिथे उमेदवार दिलेला नाही. आता मनसेची लाज काढताहेत की काय हे कळेलच दोन दिवसांत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

सरकार येऊ देत, चहल-मिंधेंना जेलमध्येच पाठवू

मुंबई महानगरपालिका आयुक़्त इक्बाल चहल आणि मिंधे मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केले. महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार याबद्दल वादच नाही. पण सत्ता आल्यानंतर या भ्रष्टाचाराची चौकशी करून जो दोषी आढळेल, मग ते चहल असोत वा मिंधे, तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला.

कोटेचा नव्हे खोटेचा

आदित्य ठाकरे यांनी यावेळी उत्तर-पूर्व मुंबईतील महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यावर शरसंधान केले. ते कोटेचा नव्हेत तर खोटेचा आहेत, असे ते म्हणाले. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा शिवसेनेने बाहेर काढला, पण त्याचे श्रेय घेण्यासाठी कोटेचा यांनी खोटं सांगत आपणच तो घोटाळा बाहेर काढल्याचा दावा विधिमंडळात केला होता. म्हणून आपण त्यांचे नाव खोटेचा ठेवले आहे, अशी मिश्कील टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आपला खासदार आता दिल्लीत जायलाच हवा

भाजप हा जुमलेबाजी करणारा, खोटे बोलणारा, भ्रष्टाचार करणारा पक्ष आहे. भाजप हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या विरोधात काम करतो. अशा महाराष्ट्रद्रोही पक्षाला जिंकू द्यायचे नाही असा निर्धार करण्याची गरज आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. आपला खासदार यावेळी दिल्लीत गेलाच पाहिजे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. आपला खासदार आता दिल्लीत गेला नाही तर यापुढे निवडणुका होणार नाहीत. कारण भाजपला देशात हुकूमशाही आणायची आहे, असा सावधगिरीचा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

यावेळी शिवसेना उपनेते सचिन अहिर, उपनेते दत्ता दळवी, आमदार रमेश कोरगावकर, विभागप्रमुख सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

भाजपची कुठेच लाट नाही, मग 200 तरी जिंकतील का?

भाजपने 400 पारचा नारा दिलाय, पण भाजप 200 च्या पार जाईल असे वाटत नाही, असे सांगतानाच त्यासंदर्भात एपंदरीत गणितच आदित्य ठाकरे यांनी यावेळी मांडले. ते म्हणाले की, देशातील सद्यस्थिती पाहता कुठेच भाजपच्या बाजूने वातावरण नाही. बिहारमध्ये तेजस्वी यादव 15 ते 20 जागांवर जिंकतील असे चित्र आहे. दिल्लीतील सातच्या सात जागा आम आदमी पार्टी आणि काँग्रेस जिंकणार आहे. पंजाब आणि हरियाणातही आम आदमी पार्टीला संधी आहे. बंगालमध्ये ममतादीदींना भाजप हरवू शकत नाही. राजस्थानातही विरोधी वातावरण आहे आणि दक्षिणेकडील राज्यांनी तर भाजपला दरवाजेच बंद केले आहेत. महाराष्ट्रात जरी काही जागा भाजपला मिळाल्याच तरी 200 च्या पुढे जाता येणार नाही.

देश संकटात आहे, बदल घडवावाच लागेल

नरेंद्र मोदी सरकारच्या काळात देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे याकडेही आदित्य ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, जम्मू-कश्मीरमधील 370 कलम हटवले म्हणतात तरीही तिथे दहशत कायम असल्याने कश्मिरी पंडित पुन्हा गेलेले नाहीत. लडाखला वेगळे राज्य बनवले, पण तिथे विकास पोहोचला नसल्याने विद्यमान खासदारही भाजपची उमेदवारी नको असे सांगताहेत. तेथील 30 ते 40 हजार लोक चीनच्या घुसखोरीविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. कारण चीन घुसतोय तरी सरकार काहीच करायला तयार नाही. म्हणूनच आता बदल घडवावाच लागेल, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.