वक्फ बोर्ड प्रकरणात 13 तासांची चौकशी; अटक केल्याचा आप नेत्यांचा दावा

आपच्या नेत्यांवर ईडीने उगारलेले कारवाईचे चक्र सुरूच असून आता आपचे आमदार अमानतुल्ला खान ईडीच्या रडारवर आहेत. दिल्ली वक्फ बोर्डावर 32 जणांची बेकायदा नियुक्ती केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची ईडीने चौकशी केली. सकाळी 11 वाजता ईडीसमोर हजर झालेले अमानतुल्ला तब्बल 14 तासांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. यामुळे त्यांना अटक झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. आपच्या नेत्यांनीही तसा दावा केला. मात्र, ईडीने आपल्याला चौकशीसाठी बोलावले होते, अटक केलेली नाही, असे अमानतुल्ला यांनी मध्यरात्रीनंतर घरी जातांना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी अमानतुल्ला खान यांना ईडीसमोर हजर होण्याचे निर्देश देत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, त्याचवेळी हे निर्देश म्हणजे अमानतुल्ला यांच्या अटकेसाठी मुक्त मुभा समजू नये असे कोर्टाने बजावले होते. गेल्या 12 नोव्हेंबर रोजी ईडीने झिशान हैदर, जावेद इमाम, दाऊद नसीर या तिघांना या प्रकरणात अटक केली होती. हे सर्वजण अमानतुल्ला खान यांच्या जवळचे असल्याचे सांगण्यात आले.

वक्फ बोर्डात बेकायदा भरती केल्याचा आरोप

दिल्ली वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी असताना अमानतुल्ला खान यांनी 32 जणांची बेकायदा भरती केल्याचा आरोप आहे. त्यांनी दिल्ली वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता बेकायदा भाडय़ाने दिल्या, बोर्डाच्या निधीचा गैरवापर केल्याचे आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. बोर्डाच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी या कथित बेकायदा भरतीबाबत वक्तव्य केले होते.

रोख रक्कम, डायरी जप्त

तपासादरम्यान अमानतुल्लाच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवरून रोख रक्कम जप्त करण्यात आली. छाप्यादरम्यान अमानतुल्लांच्या जवळच्या नातेवाइकांच्या घरी एक डायरीही सापडली. ज्यामध्ये अमानतुल्ला यांनी देश-विदेशात कोटय़वधी रुपयांचे व्यवहार केल्याचा उल्लेख आहे, असा दावा ईडीने केला आहे. सप्टेंबर 2022 मध्ये एसीबीने चार ठिकाणी छापे टाकून सुमारे 24 लाखांची रोकड जप्त केली. याशिवाय दोन बेकायदा पिस्तुले, काडतुसे आणि दारूगोळाही जप्त केला होता. त्यावेळी अटक केलेल्या अमानतुल्ला यांची 28 डिसेंबर 2022 रोजी जामिनावर सुटका झाली होती.