
>>अंजली मराठे
‘आठवण कोऱया पानाची’ हा डॉ. स्वाती घाटे यांचा पहिलाच कवितासंग्रह. कवितासंग्रह हातात घेतल्यानंतर वाचकांची उत्सुकता वाढत जाते. पहिलीच कविता ‘आठवण कोऱया पानाची’ मनाचा ठाव घेते. यात एका आईचा स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणिवेपर्यंतचा प्रवास खूपच संयत शब्दांत मांडला आहे. आपोआपच आपण पुढील कवितेकडे वळतो. सुरुवातीच्या काही कविता सहज भाव व्यक्त करणाऱया असल्या तरी त्यातील आशय सर्वसमावेशक असल्याने त्या आपल्याच वाटतात. जसजसे आपण पुढे जातो तसतसे पुढच्या कवितांमध्ये कवयित्रीची प्रगल्भता दिसून येते आणि मानवी नात्यांचे, जाणिवांचे पदर त्यांच्या कवितांमधून आपल्याला दिसून येतात.
कोसळती अविरत धारा, मन अप्रूपाने झुलते
एकात चिंब भिजताना, सर दुसरी धावत येते
‘सृजनास’ ही निसर्गाच्या माध्यमातून अखिल सृजनशील कलाविष्कारांचे अनुभव व्यक्त करणारी कविता आपल्याला चिंब करते. राधा-कृष्णाच्या रूपकातून सहजीवनाचे नवरंग चितारणारी ‘दोन गोकुळे’ ही कविता असो किंवा ‘आयुष्य’ या रचनेतील सकारात्मक जीवनदर्शन असो, कवयित्री आपल्याला विचार करायला भाग पाडते. त्यांची ‘अक्षर अभंग’ ही रचना तर लिहिणाऱयांच्या मनाचा वेध घेते. ‘अखंड ओळख’, ‘मनोरा’, ‘शब्दप्रवास’, ‘जीवननौका’, ‘परिवर्तन’ या कवितांतून त्यांचे विस्तीर्ण विषयवैविध्य व अपार शब्दसंपत्ती, शब्दांवरील पकड सहज लक्षात येते.
गावे, खेडी अन् शहरांना थेट जोडले रस्त्याने
तऱहे तऱहेच्या संस्कारांना सहज मिसळले रस्त्याने
हरित सुगंधी पायवाट ती चोरून नेली वनातुनी
डांबर काळे ओबडधोबड तिथे सांडले रस्त्याने
असा संवेदनशील सामाजिक विषय कवयित्री अगदी सहजपणे वाचकांपर्यंत पोहोचवितात, तर ‘कविता आली’ या रचनेत सृजनातील घुसमटही त्या प्रभावीपणे मांडतात.
डॉ. स्वाती घाटे व्यवसायाने डॉक्टर आहेत. म्हणूनच मानवी जीवनातील नाती, विविध पंगोरे, नात्यातील संवेदनशीलता त्यांनी अगदी जवळून अनुभवली आहे. याच जाणिवा त्यांच्या कवितांमधून वाचायला मिळतात. त्यांच्या ‘बाबा’, ‘बाई’, ‘वसा’ या कविता अंतर्मुख करतात. स्त्र्ााrच्या मनाला त्यांनी विविध अंगांनी रचनांमध्ये उलगडले आहे. काही कविता प्रासंगिक आहेत, परंतु आपल्या जीवनातील हे प्रसंग, अनुभवच तर विविध जाणिवांची, वास्तवाची आपल्याला ओळख करून देतात.
अभंग, गवळण, लावणी, गझल, वृत्तबद्ध, मुक्तछंद कविता लेखन असा विविध काव्यक्षेत्रांतील त्यांचा सहज वावर आपल्याला या संग्रहातून जाणवतो. सूक्ष्म निरीक्षण, आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव, अंगी असलेली लय, लेखनाची, सृजनाची आवड, निसर्गावर प्रेम, त्यांचे सामाजिक, काwटुंबिक स्नेहसंबंध, तत्त्वनिष्ठ, शिस्तप्रिय स्वभाव यामुळे कवयित्रीचे लेखन हे अतिशय विस्तृत, आशयसंपन्न झाले आहे. त्यात एकसुरीपणा दिसत नाही, वैविध्य दिसते.
कविता संग्रहाचे शीर्षक कदाचित हेच सांगते की, माणसाचं जीवन किंवा माणसाच्या जीवनात असलेला प्रत्येक क्षण एक कोरं पान आहे आणि त्या कोऱया पानावर, त्या एका क्षणावर आपण जे लिहू तेच आपले जीवन असते. त्या प्रत्येक क्षणाला सहजपणे स्वीकारता यायला हवं. मग त्या कोऱया पानावरच्या आठवणी आपल्या जीवनाला सर्वार्थाने समृद्ध करतात. मला वाटतं, प्रत्येक वाचकाच्या मनातील भावना कवयित्रीने या संग्रहातून व्यक्त केल्या आहेत.




























































