‘मिस्टर 360’ एबी डिव्हिलिअर्सचा क्रिकेटला रामराम, विराट कोहलीची भावूक पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आणि ‘मिस्टर 360’ नावाने ओळखला जाणारा क्रिकेटपटू एबी डिव्हिलिअर्स (AB De Villiers) याने क्रिकेटच्या सर्व स्वरुपांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. डिव्हिलिअर्सने याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र तो जगभरातील लीग खेळत होता. परंतु आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे तो आता आयपीएलमध्येही दिसणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

एबी डिव्हिलिअर्स याने संन्यासाची घोषणा केल्यानंतर त्याचा मित्र आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli ) याने भावूक पोस्ट केली आहे. विराटने डिव्हिलिअर्ससोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ‘तू (एबी डिव्हिलिअर्स) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी सर्वकाही दिलेस हे मला माहिती आहे. तू या फ्रेंचाईजीसाठी अनमोल होतास. तुझ्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. चिन्नास्वामी मैदान आणि मी देखील तुला मिस करेन. आता तुझ्यासोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटू शकणार नाही भावा. तुझा मी कायमच नंबर एक चाहता असेल’, अशी पोस्ट विराटने केली आहे.

दरम्यान, विराट कोहली आणि एबी डिव्हिलिअर्स हे दोघे मैदानासह मैदानाबाहेरही जिगरी मित्र आहेत. दोघेही एकमेकांचा आदर करतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी हे दोघे गेल्या कित्येक वर्षापासून एकत्र खेळत आहेत. गेल्या 11 वर्षांपासून हे दोघे बंगळुरुकडून खेळत आहेत. मात्र ते संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकले नाही.

आरसीबीचे मानले आभार

आरसीबीच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करत एबी डिव्हिलिअर्सने फ्रेंचाईजीचे आभार मानले. ‘आरसीबीसोबत मी बराच काळ होतो. 11 वर्ष निघन गेले आणि खेळाडूंना असे सोडून जाणे योग्य वाटत नाही. परंतु मी बराच विचार करून आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. संघ व्यवस्थापक, मित्र विराट कोहली, सहकारी, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, चाहते आणि आरसीबीच्या संपूर्ण कुटुंबाचे आभार’, असे डिव्हिलिअर्स म्हणाला.

कारकिर्द

एबी डिव्हिलिअर्स याने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 114 कसोटी, 228 वन डे आणि 78 टी-20 सामने खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 47 शतकांची नोंद आहे.