गुणवत्ता महत्त्वाची!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> दुर्गेश आखाडे

अभिनय क्षेत्रात करीअर करण्यासाठी मुंबई गाठावी लागते. या परंपरेला फाटा देत कोकणच्याच लाल मातीत राहून चित्रपट, मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे कलाकार म्हणजे अभय खडपकर. ‘माझ्यात गुणवत्ता असेल तर मला माध्यमं कणकवलीतूनही बोलावून घेतील,’ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

> अभिनयाकडे कसे वळलात?
शाळेपासून नाटकाला सुरुवात झाली. त्यानंतर स्पर्धेत आयोजकाच्या भूमिकेत मी काम करू लागलो. नाटके पाहून मनात एक ऊर्मी आली की, अरे, आपण हे का नाही करत? त्यावेळी मी कॉलेजला होतो आणि नाटक करायचं म्हणून ‘बागेश्री थिएटर्स’ नावाचा ग्रुप तयार केला. पुढे प्रल्हाद मेटे, दीनानाथ साळुंखे, पवार सर, प्रकाश कामत, दीपक परबसारख्या गुरूंचे मार्गदर्शन मिळाले. पुण्याच्या लोकांशी ओळख झाली. जर्मन थिएटर्स पाहता आले. यातून आमची जडणघडण झाली.

> व्यावसायिक रंगभूमीकडे कसे वळलात?
मी नाटकाच्या हौशी रंगभूमीचे व्यावसायिक रंगभूमीमध्ये रूपांतर केले, पण हे सर्व नकळत झाले. आमची नाटकं स्पर्धेमधून गाजायला लागली तेव्हा समोरून आम्हाला प्रयोगांसाठी विचारणा होऊ लागली. गावातील प्रयोगातून मिळणारे पैसे वाचवून नाटकासाठी साहित्य विकत घेऊ लागलो. अशाप्रकारे नकळत आम्ही व्यावसायिक रंगभूमीकडे वळलो. ‘शेवंता जित्ती हाय’, ‘नातीगोती’, ‘डोंगर म्हातारा झाला’ अशी 35 ते 40 नाटके केली. ‘किरवंत’ नाटक पाहून प्रेमानंद गज्वी यांनी आम्हाला तेच नाटक हिंदीमध्ये लिहून देत देशभर प्रयोग करण्याची परवानगी दिली.

> चित्रपटात पहिली संधी केव्हा मिळाली?
मी एसटीमध्ये असताना कोल्हापूरला नाटक करायचो. एकदा दिग्दर्शक प्रमोद शिंदे हे नाटक पाहायला आले होते. पुढे त्यांनी कणकवलीतल्या एका मित्राच्या माध्यमातून माझा शोध घेतला. “मी एक प्रोजेक्ट करतोय. त्यात तू काम करशील ना.’’ असं सांगून त्यांनी मला “शेवटचं वाक्य वाचून सही कर’’ असे सांगितले. ते शेवटचे वाक्य होते. ‘‘या कामासाठी मी एकही रुपया मानधन घेणार नाही.’’ मी विश्वासाने सही केली. तो चित्रपट म्हणजे ‘भूक.’ ऑस्करच्या शर्यतीत तो हिंदुस्थानमध्ये चौथा चित्रपट होता. त्यावेळी मला पहिले व्ही. शांताराम ऍवॉर्ड मिळाले.

> मालवणी भाषेचा काही फायदा झाला?
मी प्राकृत मराठी भाषेषह मालवणीतीलही काही नाटके केली. ‘गाव गाता गजाली’ या मालिकेनंतर लोकांना कळलं की, हा मालवणी बोलतो. त्यानंतर मला ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका मिळाली. ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील नायिका मालवणी आहे आणि माझी मालवणी बापाची भूमिका आहे. माझ्यावर मालवणीचा शिक्का बसला की काय, असे मला वाटू लागले. त्यामुळे आता चौथी संधी आली तरी मी ती घेणार नाही.

> कोकणातून इंडस्ट्रीशी कसे जोडले जाता?
तुम्ही कुठे राहता हे महत्त्वाचं नाही, तुमच्यात किती गुणवत्ता आहे ते महत्त्वाचं. मला मुंबईत राहण्याची गरज वाटत नाही. माझ्यामध्ये गुणवत्ता असेल तर माध्यमं मला कणकवलीतूनही बोलवू शकतात.