
>> अभिराम भडकमकर
दिल्लीत राष्ट्रीय नाटय़ विद्यालयामध्ये शिकताना एका गोष्टीचा खूप त्रास व्हायचा. आपल्या व्यावसायिक रंगभूमीबद्दल अनेक गैरसमज तिथे पसरलेले आहेत. व्यावसायिक रंगभूमीला नाक मुरडणाऱया मंडळींनी दिल्लीत वावरताना हे समज- गैरसमज कसे बळकट होतील याचीही काळजी घेतलेली आहे… आणि म्हणूनच “हेय, यू डू कमर्शियल थेटर?” असा प्रश्न अनेकदा विचारला जाई.
एकदा एक ज्येष्ठ नाटककार मराठी रंगभूमीचा इतिहास याविषयी भाषण करायला आले होते. त्यांनी मराठी रंगभूमीवरच्या हौशी स्तरावर काम करणाऱया दोन-तीन संस्था सोडल्या तर कुणाचेच उल्लेख केले नाहीत. मी त्यांना असं म्हटलं, “सर, चंद्रलेखा, कलावैभव, श्री चिंतामणी यांचा तुम्ही उल्लेखच केला नाही! मराठी रंगभूमीवरचे तगडे निर्माते मोहन वाघ, मोहन तोंडवळकर, विनय आपटे, प्रभाकर पणशीकर, सुधीर भट, लता नार्वेकर यांच्या नावांचा उल्लेखही केला नाहीत?” त्यावर ते कुत्सितपणे मान झटकून म्हणाले, “अरे, ते काय व्यावसायिक लोक!”
मुळापासूनच व्यवसाय करणं हे वाईटच आणि कलावंतांनी तर व्यवसायाचा विचारही करू नये असं कुठेतरी आपल्या मनामध्ये घट्ट बसलेलं असतं. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करणारे लोक बिदागी घेतात. त्यांना कोणी व्यावसायिक म्हणत नाहीत, पण लेखकाने, नटाने नाईट घेतली की, तो झाला धंदेवाईक! मराठी रंगभूमीचं खरंखुरं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये होतच नाही. मराठी रंगभूमीचं खरं चित्र दिल्लीमध्ये उभंच केलं जात नाही याचा फार त्रास व्हायचा. एनएसडीतले शिक्षकसुद्धा विचारायचे, “यहां से जाने के बाद कमर्शियल थेटर मे तो नही जाओगे ना?”
अहो, इतकंच काय, मी जेव्हा पहिलं नाटक ‘हसत खेळत’ केलं तेव्हा माझ्या एका ‘प्रायोगिक’ रंगभूमीवर काम करणाऱ्या मित्रांनी विचारलं, “ए, तू काय शिवाजी मंदिर नाटक करतोयस?” व्यावसायिक रंगभूमीवर काम करणं हे अप्रतिष्ठेचं आपणच ठरवून टाकलं. या गोष्टीचा त्रास व्हायचा, पण शांतपणे विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलं, हा आपल्याकडची वैचारिक बैठक भुसभुशीत असण्याचा परिणाम आहे.
व्यावसायिक रंगभूमीचा इतिहास खूप मोठा आहे. ‘तुझं आहे तुझ्यापाशी’सारखं दोन तत्त्वज्ञानाचा संघर्ष विनोदाच्या अंगाने मांडणारं नाटक व्यावसायिक रंगभूमीवरचंच. ‘नटसम्राट’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ ही नाटकं रंगभूमीवरचीच.
एका समीक्षक बाईंनी त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीच्या तुच्छतेचं पानोपानी प्रदर्शन करणाऱ्या पुस्तकात असा प्रश्न विचारला, “अखेर विजयाबाईसुद्धा व्यावसायिक रंगभूमीवरच गेल्या. सगळ्यांनाच तिथे जावंच लागतं का?” पण विचारावंसं वाटतं, “अहो बाई, व्यावसायिक रंगभूमीवर जाऊन विजयाबाईंनी काय केलं ते पहा ना!” ‘हमिदाबाईची कोठी’, ‘महासागर’ यांसारखी खणखणीत नाटकं दिली. आधुनिक मराठी रंगभूमीवरचं सर्वश्रेष्ठ नाटक मानलं जावं असं ‘बॅरिस्टर’सारखं खोल, गुंतागुंतीचं नाटक हे याच रंगभूमीवरचं. अगदी एलकुंचवारांचा ‘वाडा चिरेबंदी’सुद्धा विजयाबाईंनी सर्वप्रथम ‘व्यावसायिक रंगभूमीवरच’ आणलं. ‘सखाराम बाईंडर’ही इथलंच व्यावसायिक नाटक.
रंगभूमीचा दुस्वास करणं ही पद्धत मला वाटतं, सत्तरीच्या दशकापासून सुरू झाली. ‘मध्यमवर्गीय’ ही शिवी असल्याच्या काळात बहुधा हा पायंडा पडला. कारण या नाटकांचा प्रेक्षक वर्ग हा अधिकतर सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय होता, पण याच प्रेक्षकांनी दादा कोंडकेचं ‘विच्छा’ उचलून धरलं होतं. ‘गाढवाचं लग्न’, ‘पती गेले गं काठेवाडी’ या सगळ्यांनाच तितकंच मानाचं स्थान होतं. ‘जास्वंदी’सारखं वेगळं, ‘हँडस्अप’, ‘डबल गेम’, ‘कुणीतरी आहे तिथं’ अशी रहस्यमय, बबन प्रभूंचे फार्स किंवा ‘तरुण तुर्क…’सारखं, अगदी ‘वटवट सावित्री’, ‘लेकुरे…’, ’प्रेमा तुझा रंग कसा’ ‘सखाराम बाईंडर’सारखंसुद्धा!
नाटक म्हणजे केवळ एकाच पद्धतीची व्यक्तता नसून विनोदी, फार्सिकल, सामाजिक प्रश्न मांडणारी, रहस्यमय, थ्रिलर, नातेसंबंधांचा, सामाजिक परिस्थितीचा, इतकंच काय, पण राजकारणाचासुद्धा धांडोळा घेणारी नाटकं या रंगभूमीने अत्यंत उदारपणे आपल्या पोटात सामावून घेतली. मग मी आमच्या बाईंना म्हटलं, “बाई, हे जे वत्ते आहेत, ज्येष्ठ नाटककार, हे विस्तीर्ण आभाळाकडे आपल्याच छोटय़ाशा झरोक्यातून बघतात. मला एक तास द्या. मी मराठी रंगभूमीवर बोलता,” आणि मग सुट्टीमध्ये मराठी रंगभूमीचा पूर्ण आढावा घेऊन मी एक प्रेझेंटेशनच सादर केलं!
…आणि मग लोकांच्या लक्षात आलं, अरे बापरे, दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या मराठी रंगभूमीवर काय काय होऊन गेलं, काय काय होत आहे आणि काय काय होणार आहे! मला व्यावसायिक रंगभूमीचा लेखक असल्याची कधीच लाज वाटली नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रायोगिक-व्यावसायिक असे काही भेद नसतातच. प्रायोगिकता हा स्वभाव असतो. जी तुमच्यात असेल तर तुम्ही कुठेही गेलात तरी वेगळं काहीतरी करत राहता आणि नसेल तर मग अगदी स्वतला ‘प्रायोगिक’ असं लेबल चिकटवूनसुद्धा तुम्ही पाटय़ाच टाकत राहता. आज खऱया अर्थाने प्रयोग होत आहेत ते स्पर्धा रंगभूमीवर. एकाने हौशी-प्रायोगिक (हा एक नवा घोळ, हौशी की प्रायोगिक? असो!) संस्था चालवणाऱया दिग्गजाने तर स्पष्ट म्हटलं होतं, “सध्या प्रायोगिक नावाचं काही नाही, जे आहे, ते नॉनकमर्शियल अॅमाच्युअर थिएटर आहे.” त्या वादात मी पडत नाही. पण स्पर्धा रंगभूमीवर तरुणांची ऊर्जा मिळेल तितक्या कमीत कमी साधनांतून वेगवेगळा आशय सादर केला जातो, वेगवेगळ्या शैलींचा प्रयत्न केला जातो. फसण्याची भीती असते तरी ते करतात, फसतात. कधी कधी ते यशस्वी होतात. परंतु करून पाहण्याचा उत्साह कमी होत नाही. बरं, या व्याख्याही किती भुसभुशीत आहेत बघा. माझं ‘देहभान’ हे नाटक कोल्हापूरची प्रायोगिक संस्था करणार होती. जर ते तिथे सादर झालं असतं तर लोकांनी त्याला ‘प्रायोगिक’ म्हटलं असतं. पण ते व्यावसायिकवर सादर झाल्यावर ते कमर्शियल नाटक झालं. काल-परवापर्यंत प्रायोगिकवर काम करून पाहावं म्हणून सादर झालेलं नाटक उचललं गेलं की, ते आज व्यावसायिकवर येतं. म्हणजे मागच्या आठवडय़ात ते ‘प्रायोगिक’ होतं ते या आठवडय़ात व्यावसायिक झालं! असे प्रायोगिक आणि व्यावसायिकचे 56 घोळ घेऊन आपण जगतो आहोत आणि म्हणूनच ‘प्रायोगिक की व्यावसायिक?’ या वादात पडायला मला आवडत नाही. व्यावसायिक नाटकाला ज्येष्ठ दिग्दर्शिका विजयाबाई मेहता ‘लोकरंगभूमी’ असे म्हणतात. पण मला लोकनाटय़, लोकगीत याकडे जाणारा तो शब्द अधिक वाटतो. म्हणून मी या रंगभूमीला महाराष्ट्रातही आणि विशेषत दिल्लीमध्ये ‘अर्थवाही रंगभूमी’ या नावाने संबोधतो. यामध्ये ‘अर्थ’ या शब्दावर श्लेष आहे. अर्थ म्हणजे आर्थिकही आणि अर्थ म्हणजे आशयही!
ज्या रंगभूमीवर आर्थिक आणि आशयाच्या अंगाचाही प्रवाह खळखळून वाहतो आहे ती रंगभूमी म्हणजे आमची व्यावसायिक रंगभूमी! रंगभूमीला व्यवसायिक किंवा कमर्शियल म्हणण्यापेक्षा ‘अर्थवाही रंगभूमी’ म्हणून दिल्लीही आपल्याकडे पाहू लागेल. अर्थात दिल्ली आपल्याकडे पाहते की नाही याची तमा मराठी रंगभूमीने कधी बाळगली नाही आणि बाळगणार नाही. आपण आपलं काम करत राहू. नाटकावर शिक्के कशाला मारायचे! शेवटी नाटक हे नाटक असतं…फक्त नाटक!


























































