एसी लोकलचा सिंगल तिकीट प्रवास स्वस्त होणार, रेल्वे बजेटमध्ये मुंबईकरांसाठी एक हजार कोटींची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांसाठी रेल्वे बजेटकडून खूप अपेक्षा असून मुंबईच्या पायाभूत सुविधा निर्माण करणाऱया मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांसाठी (एमयूटीपी) यंदा केंद्राकडून एक हजार कोटी रूपयांची मागणी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) केली आहे.

ही मागणी मान्य झाली तर तितकाच निधी राज्य सरकारला रेल्वेसाठी द्यावा लागेल म्हणजे मुंबईकरांच्या सुखद प्रवासासाठी 2 हजार कोटी रूपयांची तरतूद होईल असे एमआरव्हीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले. तसेच एसी लोकलचा सिंगल तिकीट प्रवास स्वस्त करण्याची मागणी केली असून ती रेल्वे बजेटनंतर पूर्ण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईकरांसाठी रेल्वे बजेटमध्ये काय असणार आहे?

– यंदाच्या बजेटमध्ये आम्ही एमयूटीपी -2 मध्ये उरलेले महत्वाकांक्षी प्रकल्प, एमयूटीपी -3 आणि एमयूटी -3 अ मधील प्रकल्पांसाठी एकत्र अशा 1 हजार कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्यानंतर तितकाच निधी राज्य सरकारमार्फत मिळत असल्याने एकूण 2 हजार कोटी रूपये या प्रकल्पांच्या बांधणीसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

नवीन एसी लोकल केव्हा दाखल होतील…?

– नवीन एसी लोकलचे डिझाईन आणि इतर बाबी अजून ठरलेल्या नाहीत. त्यामुळे टेंडरला थोडा उशीर लागणार आहे. निविदांची प्रक्रिया उशीरा सुरू होणार असल्याने एसी लोकल येण्यास थोडा अवधी लागणार आहे.

मिक्स एसी लोकल येण्याची काय शक्यता आहे?

– एसी लोकल मिक्स डब्यांची चालविण्याचे प्रयोजन मागे पडले आहे. कारण तांत्रिकदृष्टया अर्धे डबे एसी आणि अर्धे डबे साधे चालविणे शक्य नाही. त्यामुळे शंभर टक्के एसी डब्यांचीच लोकल मुंबईत धावणार आहे.

एसी लोकलचे भाडे जादा असल्याने प्रवाशांचा तिला प्रतिसाद नाही…

– एसी लोकलचे सिंगल तिकीट जर्नी म्हणजे कार्ड तिकीट एकेरी प्रवास महागडा आहे. मासिक पासचे भाडे तेवढे जास्त जात नाही. परंतू सिंगल तिकीट जर्नी प्रवासाचे भाडे थोड कमी करण्याची गरज असून या रेल्वे बजेटमध्ये ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता कमी असली तरी रेल्वे बजेटनंतर एसी लोकलच्या सिंगल तिकीटाचे दर कमी होतील.

हार्बरचा सीएसएमटी ते पनवेल एलिवेटेड फास्ट कॉरीडॉर बाजूला पडला आहे?

– मेट्रोचे वडाळा ते कासारवडवली तसेच अन्य मार्ग होत असल्याने हार्बरचा सीएसएमटी ते पनवेल एलिवेटेड फास्ट कॉरीडॉर मार्ग रेल्वेने तूर्त बाजूला ठेवला आहे. मात्र तरीही हा प्रकल्प राबविणे राज्य सरकारच्या हातात आहे. हा प्रकल्प राज्याने केला तर लोकलच्या आकाराची एलिवेटेड ब्रॉडगेज मेट्रो चालविणे शक्य होईल.

एमयूटीपी – 2 (8,080 कोटी)
ठाणे ते दिवा 5 व 6 वी लाइन
सीएसएमटी ते कुर्ला 5 व 6 वी लाइन
बोरीवली ते मुंबई सेंट्रल 6 वी लाइन
एमयूटीपी – 3 (10,947 कोटी)
विरार-डहाणू चौपदरीकरण (60 कि.मी.)
पनवेल-कर्जत दुपदरीकरण (30 कि.मी.)
ऐरोली-कळवा लिंक (8 कि.मी.)
47 एसी लोकल एमयूटीपी – 3 अ (33,690 कोटी)
हार्बर लाइनचा बोरिवलीपर्यंत विस्तार
बोरिवली-विरार 5 व 6 वी लाइन
कल्याण-आसनगांव 4 थी लाइन
कल्याण-बदलापुर 3 व 4 थी लाइन
कल्याण यार्ड रिमॉडलिंग
कम्यूनिकेशन बेस्ड कंट्रोल सिस्टम
191 एसी लोकल