नगर रोडवरील ईसारवाडी फाट्यावर अपघात, ऊसतोड कुटुंबातील मायलेकासह बैल ठार, बापलेक गंभीर जखमी

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणीला निघालेल्या एका ऊसतोड कामगाराच्या बैलगाडीला भरधाव जाणार्‍या एका एसटी महामंडळाच्या बसने ईसारवाडी फाट्यावर जोराची धडक दिली. या अपघातात बैलगाडीत बसलेल्या मायलेकासह 1 बैल जागीच ठार झाला तर बापलेक गंभीर जखमी झाले. हा अपघात संभाजीनगर-नगर रोडवरील ईसारवाडी फाट्याजवळ सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. आठवडाभरापासून या रोडवर अपघातांची मालिका सुरू आहे.

नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज गोविंद विठ्ठल गिरे हे आपल्या कुटुंबासह ऊसतोडणीसाठी निघाले होते. त्यांच्यासोबत पत्नी सोन्याबाई गोविंद गिरे (40), अर्जुन गोविंद गिरे (10), बाळू गोविंद गिरे (15) असे कुटुंबातील चौघे ऊसतोडणीसाठी जात होते. संभाजीनगर-पुणे महामार्गाने जात असताना त्यांची बैलगाडी ईसारवाडी फाट्याजवळील इंडियन ढाब्यापासून महामार्ग ओलांडत होती. यावेळी नाशिककडून संभाजीनगरच्या दिशने येणार्‍या एसटी महामंडळाच्या बसने (एमएच 14 बीटी 2500) बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिली.

ही धडक इतकी भयंकर होती की, बैलगाडीचा चुराडा होऊन एक बैल लांब फेकला गेल्याने जागीच ठार झाला तर गाडीत बसलेल्या सोन्याबाई गोविंद गिरे व अर्जुन गोविंद गिरे या मायलेकाचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातात गोविंद गिरे व मुलगा बाळू गोविंद गिरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद हानिफ, पोलीस अंमलदार विक्रम मडावी, जयेश जाधव, एस.ए. गवळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नानीजच्या रुग्णवाहिकेचे संदीप त्रिंबके व 108 सरकारी रुग्णवाहिकेचे डॉ. अनंत पाटील व पायलट मुसा शेख यांच्या मदतीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. अपघातात जखमी झालेल्या बापलेकावर गंगापूर रुग्णलयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.