
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर सोमवारी तिथीनुसार ३४५वा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा शिवभक्तांच्या प्रचंड गर्दीत आणि उदंड उत्साहात साजरा झाला. रायगडावर हिरवाईने पांघरलेली शाल, कापसाळलेली दाट धुक्याची झालर अशा स्वर्गीय वातावरणात ब्रह्मवृंदांनी शिवरायांचे पूजन केले तेव्हा वरुणराजानेही जलाभिषेक करून तमाम शिवभक्तांना चिंब केले. तुफानी पावसाची तमा न बाळगता पारंपरिक वेशभूषा केलेल्या मावळय़ांनी ढोलताशांचा गजर आणि तुतारीच्या निनादात भगवे झेंडे आणि अब्दागिरी आकाशात उंच उंच फडकवत आपल्या राजाला मानवंदना दिली. ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गगनभेदी जयघोष, भालेबर्ची, तलवारींचा खणखणाट आणि शाहीरांच्या पोवाडय़ांनी रायगडावर जणू शिवशाही अवतरली होती.
(छाया – दिलीप अंबावले)


























































