
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नवी दिल्लीत एका आरोपी पोलिसाला संडासात डांबून फरार झाला आहे. अनेकांना ऑनलाईन फ्रॉडमधून गंडा घातलेल्या या आरोपीला काही तासांपूर्वीच पश्चिम बंगाल पोलिसांनी पंजाब येथून अटक केली होती. पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे पश्चिम बंगालच्या सायबर क्राईम युनिटचे हसे झाले आहे.
गगनदीप सिंग असे त्या आरोपीचे नाव असून त्याने पश्चिम बंगालमध्ये अनेकांना बँक खात्यांमध्ये ऑनलाईन फ्रॉड करून लाखोंचा चुना लावला आहे. पश्चिम बंगालच्या सायबर क्राईम पथकाला गगनदीप पंजाबमध्ये लपला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या पथकाने पंजाब पोलिसांच्या मदतीने गगनदीपला अटक केली. पंजाबवरून त्याला पश्चिम बंगालला नेत असताना पोलीस त्याला घेऊन दिल्लीतील बंगा भवन येथे गेले होते. तेथे गगनदीपने त्याला शौचाला जायचे आहे असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर एक पोलीस त्याला संडासाजवळ घेऊन गेला. मात्र तेथे गगनदीपने संधीचा फायदा घेत त्या पोलिसालाच संडासात डांबले व स्वत: तेथून पळ काढला. त्यानंतर काही वेळाने इतर पोलिसांना हा प्रकार समजताच गगनदीपला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.






















































