
वाढवण बंदरासाठी उभारण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनात डहाणू तालुक्यातील तवा गावातील किरण पालवा यांचे ५० लाख रुपये बँक कर्मचारी आणि दलालांनी परस्पर काढले होते. याप्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. याबाबतचे वृत्त दै. ‘सामना’तून प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले असून झोल करणाऱ्या दलालांवर नागरवाई होणार आहे. डहाणूचे सक्षम प्राधिकरी महेश सागर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कोटक बँकेचे शाखा व्यवस्थापक यांना पत्र पाठवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मोबदला देण्यासाठी महाराष्ट्र बँकेचे खाते दिले असताना दलालांनी किरण पालवा यांच्या अंगठ्याचा चुकीचा वापर करून बायोमेट्रिक पद्धतीने कोटक महिंद्रा बँकेत खाते उघडले होते. या बँकेत भूसंपादन विभागाने निधी जमााही केला होता. किरण पालवा यांनी या बँक खात्यातील पैशांची चौकशी केली असता त्यांच्या खात्यामधून तब्बल ५० लाख २८ हजार रुपये परस्पर काढल्याचे आणि इतर ठिकाणी खर्च केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी पालघर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली.
बँक कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार
महामार्गमध्ये बाधित असलेल्या लाभार्थ्यांची किंवा इतर व्यक्तींची बँक खाती उघडणे ही प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार करणे बँकेला आवश्यक आणि बंधनकारक आहे. मात्र तसे न करता बँकेतील खाते उघडण्याची प्रकरणे हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून गंभीर गैरप्रकार केल्याचे सक्षम प्राधिकरी महेश सागर यांनी सांगितले.


























































