
सामना ऑनलाईन । नागपूर
राज्यातील अनेक शाळांमधून खासगी क्लासेससाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. शाळा आणि क्लासच्या संगनमतामुळे अनेक शाळांतील उपस्थिती कमी झाली आहे. इंटिग्रेटेड कोचिंग क्लास पद्धतीला आळा घालण्यासाठी शाळांमध्ये जीओटॅगिंग सिस्टमद्वारे बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इंटिग्रेटेड कोचिंग क्लास चालवणाऱ्या शाळांवर कारवाई करून प्रसंगी त्यांची मान्यताही रद्द केली जाईल अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली जात आहे.
राज्यभरात फुटलेले कोचिंग क्लासचे पेव, यामुळे शाळांतील कमी झालेली हजेरी, तसेच पालकांची मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या लुटीबाबत शिवसेनेचचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, अनेक शाळांमधून ठरावीक क्लासमध्ये घालण्यास विद्यार्थ्यांवर सक्ती केली जाते. परिणामी पालकांची व विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणावर लूट केली जात आहे. त्याचप्रमाणे काही क्लासेसनाच आता शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असल्याची बाब या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहासमोर आणण्यात आली. यावर बोलताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील शाळांना इंटिग्रेटेड कोचिंग क्लासची कीड लागली असल्याचे सांगितले. हे राखण्यासाठी अशाप्रकारे इंटिगेटेड कोचिंग क्लास चालविणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
– अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी सीईटी, जेईई, आयआयटी अशा परीक्षांसाठी १ ते ३ लाख इतकी प्रचंड फी शुल्क घेऊन विद्यार्थ्यांची लूट केली जाते. ही फसवणूक रोखण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला.
– यावर बोलताना राज्यातील खासगी शिकवणी क्लासवर नियंत्रण आणण्यासाठी अधिनियम तयार करण्याचा मसुदा तयार करण्यात येत आहे. यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आला आहे.
– हा अहवाल सादर करण्यात आला असून याविषयीचा कायदा करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे तावडे म्हणाले.
घरगुती कोचिंग क्लासवर कारवाई नाही
२५ ते ५० मुलांना टय़ूशन देऊन रोजगार मिळवणाऱ्या गृहिणी तसेच तरुणांना या कायद्यातून वगळण्यात येणार आहे. अशा टय़ूशनवर कारवाई करण्यात येणार नसल्याचे तावडे यांनी पुढे सांगितले.
दहावीच्या परीक्षेतील ऑब्जेक्टिव्ह कमी करणार
राज्यातील दहावी-बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची स्थिती पाहता ‘एनसीआरटी’च्या धर्तीवर राज्यातही अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे. त्याचप्रमाणे दहावीच्या प्रश्नपत्रिकेतील ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कमी करून सबजेक्टिव्ह प्रश्नांवर अधिक भर देण्यात येईल. तसेच अभ्यासक्रमातही बदल केला जाणार असल्याचे तावडे म्हणाले.
वेळापत्रक कोलमडल्याने पेपर पुढे ढकलले
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांना आणि निकालांना होणाऱया विलंबामुळे लाखो विद्यार्थी आणि पालक हैराण होतात. विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे यंदा ‘लॉ’ अभ्यासक्रमाच्या परीक्षा सतत पुढे ढकलल्या गेल्या होत्या. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत याची कबुली दिली. ‘लॉ’च्या ३० परीक्षांचे वेळापत्रक कोलमडल्याने या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या असे त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठातील अनागोंदी कारभाराबाबत काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर माहिती देताना शिक्षणमंत्री तावडे म्हणाले की, गेल्या वर्षी विद्यापीठात गोंधळ झाला हे खरे असून त्याबद्दल कुलपतींनी कुलगुरूंना बडतर्फ केले होते.
प्राध्यापकांना पेपर तपासणी करताच येत नव्हती
यंदाच्या वर्षी विद्यापीठात गोंधळ झाला नाही. केवळ लॉच्या ३० परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या असे तावडे यांनी सांगितले. लॉचे प्राध्यापक हे व्हिजिटिंग फॅकल्टी होते. त्यामुळे त्यांना पेपर तपासणी करता येत नव्हती. त्याच दरम्यान काही विद्यार्थी न्यायालयात गेले होते आणि त्यामुळे ३० परीक्षा पुढे ढकलल्या, अशी माहिती त्यांनी दिली.


























































