
आसावरी जोशी,[email protected]
मोहन जोशी… हुनरबाज व्यक्तिमत्त्व, मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपटांत खलनायक आणि पुन्हा मराठी रंगभूमी चित्रपटात स्थिरावणं. आजच्या घडीला त्यांचे एकूण ६०० च्या वर चित्रपट झाले आहेत… या बहारदार प्रवासाविषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा…
डोळ्यांत विलक्षण मिश्कील भाव… चष्म्याआडून लुकलुकणारे… झकास व्यक्तिमत्त्व… रुबाबदार… स्वभावातील खटपणा… हजरजबाबीपणा… दिलखुलास वृत्ती… प्रथमदर्शनीच समजून येणारी… दमदार आवाज… अत्यंत शुद्ध उच्चार… स्वच्छ… संस्कारीत वाणी… रंगभूमीवरचा प्रत्यक्ष दिसणारा वावर भारदस्त… मराठी रंगभूमीने आणि चित्रपटांनीही या व्यक्तिमत्त्वातील प्रत्येक पैलूचा छानदार आणि पुरेपूर वापर करून घेतला… पुढे हा हुनरबाज कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत गेला आणि बॉलीवूडला प्राण, अमरीश पुरी, सदाशिव अमरापूरकर यांच्यानंतरचा दणदणीत खलनायक सापडला.
मोहन जोशी… ‘मी हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळी दहाव्या क्रमांकाचा खलनायक होतो.’ दिलखुलासपणे हसत हसत मोहनजी सांगत होते. नुकताच त्यांनी केवळ आपल्या चित्रपट कारकीर्दीतील ६०० चित्रपटांचा टप्पा पार केला. एका अस्सल, मराठमोळ्या गुणी कलाकाराच्या दृष्टीने ही खरोखरच दखल घेण्याजोगी कौतुकास्पद गोष्ट आहे.
घरातून आजोळची पार्श्वभूमी पु. भा. भावेंसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांची. हे संस्कार वाणीतून, उच्चारांतून सहज प्रतीत होतात. मराठी रंगभूमीचा ठाशीव संस्कार मोहनजींच्या कोणत्याही अभिनयातून आणि सहज वावरण्यातून दिसतो… जाणवत राहातो. ६०० या चित्रपटसंख्येच्या निमित्ताने त्यांच्याशी ‘फुलोरा’च्या वतीने गप्पा मारण्याचा मोह आवरला नाही. प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा असूनही पावसाचा कंटाळवाणा मोडता सहन करून आम्ही फोनवरच्या गप्पांना प्राधान्य दिलं. जेव्हा समोरची व्यक्ती दिलखुलास आणि मनमोकळी असते तेव्हा या गप्पा कुठेही रंगू शकतात याचा मोहनजींशी बोलताना मला पुरेपूर प्रत्यय येत होता.
६०० चित्रपट
मी काही असा टप्पा ठरवला नव्हता. मुळात हिंदी चित्रपटसृष्टीत यायचे हेच मी ठरवले नव्हते. रंगभूमीची ओढ लहानपणापासून असणाऱया मोहनजींनी नाटकाच्या वेडापायी किर्लोस्कर संस्थेतील नोकरी सहज सोडली होती आणि पूर्णवेळ नाटकाला दिला. ‘कुर्यात सदा टिंगलम’ या नाटकानंतर मोहन जोशींनी मागे वळून पाहिलेच नाही. रंगभूमी, मराठी चित्रपट यासोबत गौतम आणि मार्कंड अधिकारींकडून ‘भूकंप’ या हिंदी चित्रपटाची संधी मिळाली… आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला एक वेगळ्या पठडीतला, अजून एक दमदार व्यक्तिमत्त्व असलेला खलनायक मिळाला. मोहनजी याविषयी बोलताना म्हणाले, प्राणसाहेब हे तेव्हा बॉलीवूडचे प्रथम क्रमांकाचे खलनायक होते. पण खलनायकासोबतच चरित्रपटांत त्यांचे व्यक्तित्त्व जास्त खुलत होते. तेच अमरीश पुरींचाही कल त्याच दिशेने चालला होता. सदाशिव अमरापूरदेखील खलनायक साकारून कंटाळले होते आणि अचानक हिंदी निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना माझ्यात खलनायक दिसला. जेव्हा मला ‘भूकंप’ मिळाला त्याच्या आधीच मी सात हिंदी चित्रपट घेतले होते. त्यांना माझ्या चेहऱयात कोणते खलनायकी गुण दिसले हे मला समजले नाही, पण जेव्हा मी माझा खलनायकी रूपातला चेहरा पाहिला तेव्हा मी स्वतःच घाबरून गेलो. मोहनजी हसत हसत म्हणाले.
मग मी थांबलोच नाही. हिंदी, भोजपुरी, कन्नड अशा सर्वच भाषांमधून मोहनजींनी संचार केला. हिंदीसोबत भोजपुरी कन्नडमधूनही ते सहज वावरले. हिंदीच्या बरोबरीने भोजपुरी आली. पण त्यांचा जन्म बंगळुरूचा असल्यामुळे कन्नड भाषेत चित्रपट करणे हे ते स्वतःचे कर्तव्यच समजले.
छानदार प्रवास
आपल्या या हिंदी प्रवासाविषयी मोहनजी सांगतात की, मजा म्हणून मी एक हिंदी चित्रपट केला आणि लगोलग माझ्याकडे हिंदी चित्रपट अक्षरशः चालत आले. मलाही मग हिंदीतून खलनायक साकारण्याचे व्यसनच लागले. शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेव्हाही हिंदी चित्रपटसृष्टीत मराठीच्या तुलनेत पैसे चांगल्यापैकी मिळायचे. शेवटी मी एक संसारी माणूस होतो. दोन मुलांची जबाबदारी होती. आणि चांगलं जगण्यासाठी हातात थोडाफार पैसा असावाच लागतो. अजूनही मराठी नाटकांची आणि चित्रपटांची आर्थिक गणितं वास्तवाशी विसंगत आहेत. हसत हसत मोहनजींनी टिप्पणी केली.
तेव्हा ते हिंदीत इतके रमले होते की, ७ ते २ आणि २ ते १० अशा दोन शिफ्टमध्ये काम चालायचे. केवळ हिंदी चित्रपटांची संख्याच ३४५ ते ३५० वर गेली. एकाच शुक्रवारी माझे तीन हिंदी चित्रपट प्रदर्शित व्हायचे. हिंदी निर्मात्यांनीही माझ्यावर खूप प्रेम केले. कॉन्ट्रक्ट वगैरे भानगड आमच्यात नसायची. थेट कामं स्वीकारायचो.
पुन्हा मराठी नाटक
येथेच मोहनजी आपल्या मूळ आवडीच्या दूर जाण्याने एकीकडे खूप अस्वस्थ होत होते. आपल्याला मराठी रंगभूमीवर कुणीच विचारत नाही या कल्पनेने बेचैन होत होते. या अस्वस्थतेतून मोहनजींनी अचानक हिंदी चित्रपटांतून काम करणं थांबवलं. स्थिरावलेली आर्थिक बाजू हेही त्यामागचं कारण होतं. आणि मग एकाहून एक सकस मराठी नाटकं त्यांनी द्यायला सुरुवात केली. अनेक नाटकांच्या सीडीज त्यांनी आपल्या गौरीनंदन संस्थेमार्फत बाजारात आणल्या. दर्जेदार दूरचित्रवाणी मालिका आणल्या.
आपल्या घरी पारितोषिक मिळाल्यानंतर होणारा आनंद काही वेगळाच असतो. सकस केल्याचे समाधान मिळते. हिंदी आणि अन्य भाषेच्या टप्प्यानंतर अनेक मराठी नाटकं, मराठी चित्रपट ‘तू तिथं मी’सारखा दर्जेदार, अर्थपूर्ण चित्रपट, मालिका, मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्षपद असा डौलदार प्रवास मोहनजींनी केला.
आजच्या मराठी रंगभूमीविषयी बोलताना कौतुक त्यांच्या शब्दात मावत नव्हते. जवळपास प्रत्येक मराठी नाटक त्यांनी पाहिले होते. त्यावर ते टिपण्णी करत होते. नवीन कलावंतांची प्रशंसा तर त्यांनी खुल्या मनाने केली. ‘संगीत देवबाभळी’, ‘अनन्या’, मुक्ता बर्वे, आजचे संगीत नाटक या साऱयांचे मोहनजी दिलखुलास कौतुक करतात. बोलता बोलता म्हणाले, आजच्या या नव्या दमाच्या मराठी कलाकारांची भीती वाटते. आपण त्यांच्यासमोर टिकू शकू की नाही? त्यांचा आवाका जबरदस्त आहे. फार चांगले दिवस रंगभूमीला आले आहेत.
मराठी मालिकाही मला आवडतात. ‘काहे दिया परदेस’ खूप चांगला आशय असणारी मालिका होती. माझी व्यक्तिरेखा मला खूप भावली होती. विशेषतः गौरी आणि तिच्या वडिलांचा भावबंध. आपली मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी ही स्वतःच एक प्रयोगशाळा आहेत. उत्तमोत्तम प्रयोग त्यात होत असतात. यातूनच कलाकार घडत जातो.
आज मोहनजी ‘सोयरीक’ नावाचं नाटक करताहेत. ‘पुष्पक विमान’ प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. त्याच्या प्रसिद्धीत ते मग्न आहेत.
एका छान व्यक्तिमत्त्वाशी गप्पा मारण्याचा मला मस्त अनुभव येत होता. आपल्या मातीवर प्रेम, तिच्याशी इमान… पुन्हा इतर भाषिक चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तृत्त्वाने कमावलेला मान… सर्व हिंदी निर्मात्यांशी, दिग्दर्शकांशी चांगले संबंध… पुन्हा आपल्या मराठी नाटय़-चित्रपटांत स्थिरावण्याची तृप्ती… असे सारे रंग मला संभाषणात जाणवत होते… आणि ‘फुलोरा’साठी पुन्हा एकदा एका छान व्यक्तिमत्त्वाची निवड केली यावर मीही स्वतःशीच खूश होत होते.





















































