
अभिनेता-गायक यशोमन आपटे ‘फुलपाखरू’ या मराठी टीव्ही मालिकेपासून लोकप्रिय आहे. यशोमन सध्या ‘शुभविवाह’ या मालिकेत आकाशच्या भूमिकेत दिसत आहे. पार्ले टिळक विद्यालयातून त्यांचे शालेय शिक्षण, तर डहाणूकर कॉलेजमधून कॉलेज शिक्षण पूर्ण झाले आहे. यशोमन जितका फूडी आहे, तितकाच डाएटबद्दल सजग आहे.
यशोमनला मोमोज आणि शोरमा खूप आवडतात. त्यासाठी नवनवीन ठिकाणी जायची त्याची तयारी असते. बटर चिकन, नान, चिकन बिर्याणी, स्टार्टरमध्ये चिकन चिल्ली ड्राय, गोड पदार्थांत बासुंदी, सध्याच्या हंगामात आमरस. विशेष म्हणजे हॉटेलपेक्षा रस्त्यावरचे चायनीज जेवण त्याला खूप जास्त आवडते.
यशोमनला आईच्या हातचा साधा आमटीभात खूपच आवडतो. आईच्या स्वयंपाकाचे कौतुक करताना तो थकत नाही. आईच्या हातची आमटी, गुलाबजाम तर एकदम प्रिय. तो शक्यतो बाहेरचे खाणे किंवा जंक फूड खाणे टाळतो. वेळ मिळेल तसं धावणं, मोकळय़ा जागेत आणि घरी जमेल तसा व्यायाम करतो. त्याच्या डाएटवरून सेटवर मजेशीर किस्से घडतात. डाएटमुळे तो गोड खाणे टाळतो. ‘फुलपाखरू’ मालिकेच्या सेटवर त्याचे सहकलाकार, टीम सदस्य त्याला जबरदस्तीने खाऊ घालायचे किंवा प्लेटमध्ये गोड पदार्थ ठेवायचे. प्लेटमध्ये पदार्थ आला की, तो टाकून देणे योग्य नाही. त्यामुळे यशोमनची पंचायत व्हायची. नंतर नंतर तर खाताना मित्र जवळ आले की तो प्लेट घेऊन पळून जायचा.
त्याच्या मते, बिनधास्त खा. फक्त एवढी काळजी नक्की घ्या की, जेवढं खाल तेवढं पचवा. थोडा जरी व्यायाम केला ना तरी आपल्याला मानसिकरीत्या तरी बरे वाटते की, मी आज एवढे खाल्ले तर तेवढे पचविलेदेखील! असे करू नका की, नुसतं खा खा खाल्लं आणि बसून राहिलं. व्यायामही तितकाच गरजेचा आहे.
थंडगार आंबा
सध्या आंब्याचा सीझन आहे. यशोमन सांगतो, ‘‘गरम पुरी किंवा चपातीबरोबर थंड आमरस हे एक डेडली कॉम्बिनेशन आहे. जेवणानंतर आईस्क्रीम किंवा थंड आमरस व थंड आंबा म्हणजे जेवण्याच्या आधी आंबा फ्रिजमध्ये ठेवायचा आणि मग जेवण झाल्यावर त्याला चोखून घ्यायचं. मग आंबा कुठूनही खाल्ला तरी थंड लागतो. आहे की नाही यशोमनची आंबा खाण्याची अनोखी स्टाइल.
– मृदा झरेकर, म. ल. डहाणूकर कॉलेज

























































