सुंदर दिसण्याच्या नादात श्रीदेवीने जीव गमावला, पत्नीच्या मृत्यू प्रकरणी बोनी कपूर यांनी सोडले मौन

श्रीदेवी

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला पाच वर्षे झाली आहेत. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला. श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणीही त्यांचे पती, चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची बरीच चौकशी झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूचे खरे कारण सांगितले आहे.

24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलच्या खोलीत बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला होता. त्या वेळी श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. अखेर एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या मृत्यू वेळी रात्री नेमके काय घडले ते सांगितले आहे. ‘‘श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालाच नव्हता. तो एक अपघाती मृत्यू होता. तिच्या निधनानंतर मला लाय डिटेक्टर चाचणीलाही सामोरे जावे लागले होते,’’ असे बोनी कपूर म्हणाले. ‘‘श्रीदेवीचे निधन झाले त्या वेळी त्या स्ट्रिक्ट डाएटवर होत्या. ती डाएट म्हणून खूप वेळ उपाशी राहायची. जेवणात मिठाचा समावेश करायची नाही. त्यामुळे अनेकदा तिला चक्कर यायची. डोळ्यासमोर अंधारी यायची. स्क्रिनवर छान दिसावे यासाठी ती हे सगळे करायची. आमचे लग्न झाल्यापासून अनेकदा तिला लो बीपी, ब्लॅकआऊटचा त्रास झाला होता,’’ असे बोनी कपूर यांनी सांगितले.