कळंबोलीत पाण्याचा ठणठणाट, शिवसेनेची सिडकोवर धडक; सणासुदीपूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चक्क पावसाळ्यात कळंबोलीत पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिडको कार्यालयावर धडक दिली. सणासुदीपूर्वी कळंबोलीसह अन्य भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी या वेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सिडको प्रशासनाकडे केली असून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीतील विविध भागांत कमी दाबाने तसेच अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. आगामी गणेशोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढणार असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने पाहणी करून बिघाड दुरुस्त करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सिडकोच्या कार्यालयावर धडक देण्यात आली. या आंदोलनात विभागप्रमुख विश्वास पेटकर, शहर संघटक ज्योती मोहिते, उपशहर संघटक निशा जाधव, विभाग संघटक सुनीता चव्हाण, महेश गुरव, विक्रम ठाकरे, राजाराम दळवी, राजेंद्र उतेकर, रूपेश धाडवे, रूपेश ठोंबरे, बापू इथंपे आणि अशोक सानप आदी सहभागी झाले होते. सिडकोचे सहाय्यक अभियंता प्रफुल देवरे आणि प्रशांत चाहारे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

… तर आंदोलन छेडणार
कळंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून या वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात सिडको प्रशासन अपयशी ठरले आहे. पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विभागप्रमुख विश्वास पेटकर यांनी दिला आहे.