
अदानी समुहाने मोठा निर्णय घेतला असून 20 हजार कोटींचा एफपीओ रद्द केला आहे. शेअर बाजारातील अस्थिरता पाहता कंपनीच्या बोर्डाने एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी दिली आहे.
शेअर बाजारातील चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा कंपनीचा उद्देश असल्याचे गौतम अदानी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आम्ही एफपीओद्वारे मिळालेली रक्कम गुंतवणूकदारांना परत करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
Adani enterprises not to proceed with the FPO of shares worth Rs 20,000 Crore pic.twitter.com/uDCqf1gPHq
— ANI (@ANI) February 1, 2023
दरम्यान, अदानी समूहाने एफपीओद्वारे बाजारातून 20 हजार कोटी रुपये उभारण्याचे ठरवले होते. कंपनी एफपीओमध्ये एकूण 6 कोटी 47 लाख 38 हजार 475 शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणले होते. गुंतवणूकदारांना किमान चार स्लॉटसाठी बोली लावता येणार होती. कंपनीने 3112 रुपये ते 3276 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केली होती. लोअर बँडवर 13.5 टक्के सूट दिली जात होती. परंतु आता ही प्रक्रियाच रद्द करण्यात आली असून ज्या गुंतवणूकदारांनी एफपीओसाठी पैसे लावले होते त्यांचे पैसे परत देण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतला आहे.
एफपीओ म्हणजे काय?
आयपीओनंतर कंपनीची शेअर बाजारात नोंदणी होते. त्यानंतर काही कालावधीने कंपनीला व्यवसाय वाढीसाठी पुन्हा भांडवलाची गरज भासते. अशा वेळी कंपनी पुन्हा आपले शेअर्स विक्रीला काढते. त्यालाच एफपीओ असे म्हणतात. एफपीओमध्ये सहसा प्रवर्तक आपले शेअर्स विकतात. काही वेळेला कंपनी एफपीओमध्ये नवीन शेअर्सही जारी करते. जेव्हा कंपनी शेअर्सची विक्री फक्त आपल्या शेअर होल्डर्सना करते, त्याला राइट इश्यू म्हणतात. एफपीओ नवीन आणि जुन्या गुंतवणूकदारांसाठी असतो. एफपीओमध्ये सहसा स्वस्तात शेअर्स मिळतात. तर किरकोळ गुंतवणूकदारांना एफपीओमध्ये सूट दिली जाते.
























































