रोज एक वेलची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन

तोंडाला चव येण्यासाठी माऊथ फ्रेशनर म्हणून वेलची आपण बरेचदा खातो. तो एक मसाल्याचा पदार्थ असल्याने आपल्या खाद्यपदार्थांमध्येही आपण त्याचा वापर करतो. चहामध्येही वेलची घातली जाते. पण नुसती वेलची खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी किती फायदा होतो याची आपल्याला कल्पनाही नाही. कफ, खोकला, अस्थमा, मूळव्याध आणि लघवीच्या आजारांमध्ये होणारी जळजळ थांबवायची असेल तर वेलची खूपच फायद्याची ठरते. हृदय आणि गळ्याला वेलचीपासून खूप आराम मिळतो. वेलचीमुळे उलटय़ा होणे आणि जीव घाबराघुबरा होणेही थांबवता येऊ शकते.

झोपण्यापूर्वी फक्त एक वेलची खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्याने अनेक प्रकारचे फायदे मिळतात. यातच पहिला आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा फायदा म्हणजे वाढलेले पोट कमी होते. त्यासाठी रात्री दोन वेलची खाऊन त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळते. यासोबतच यातील फायबर आणि कॅल्शियम वजन नियंत्रणात ठेवते. दुसरे म्हणजे केस गळायचे थांबवता येतात. त्यासाठीही रात्री २ वेलची खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायचे. यामुळे केस गळायचे थांबून ते काळेभोर होतात आणि केसांमधील कोंडाही निघून जातो.

आणखी एक फायदा म्हणजे शरीराचे रक्ताभिसरण सुरळीत आणि योग्य प्रकारे व्हायचे असेल तरी वरील प्रयोग करून पाहा. रात्री २ वेलची खाऊन त्यावर कोमट पाणी पिऊन बघा. विशेष म्हणजे रक्ताभिसरण नीट झाल्यामुळे ते शुद्ध होते. त्यामुळे अर्थातच त्वचा तुकतुकीत दिसू शकते. याच प्रयोगाने आपली पचनक्रियाही सुधारते. वेलची खाऊन गरम पाणी प्यायल्याने आतडी आणि किडनी स्वच्छ होते. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. म्हणून आजपासूनच रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायला सुरुवात कराच.