मुंबईची हवा बिघडली, रोगराई पसरलीय तरी बेकायदा सरकार थंड, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

तीन महिन्यांपासून मुंबईची हवा बिघडली असून हवेचा दर्जा ‘वाईट’ पासून ‘अतिवाईट’ नोंद झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार बळावले आहेत. याबाबत आवाज उठवूनही ‘बेकायदा’ सरकार मात्र थंड पडले असल्याचा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबईतील हवेचा निर्देशांक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. सध्या मुंबईचा एअर क्कालिटी इंडेक्स (एक्यूआय) 344 इतके म्हणजे ‘अत्यंत खराब’ पातळीच्या जवळ पोहोचला आहे. यातच कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण यामुळे प्रकृतीच्या समस्या वाढल्या आहेत. यामुळे पालिकेसह सरकारी रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. याची गंभीर दखल घेऊन सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत, मात्र बेकायदेशीर सरकार काहीच करीत नसल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

सरकारचे डोळे बंद आहेत का?
– मुंबईत मोठय़ा प्रमाणावर सुरू असणाऱया बांधकामातून उडणारी धूळही प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. शिवाय इतरही कारणे आहेत. असे असताना यावर कोणत्याही उपाययोजना सरकारकडून करण्यात येत नाहीत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे पाहत नसलेल्या सरकारचे डोळे बंद आहेत का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

पर्यावरणपूरक उपक्रम बासनात
– महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरणमंत्री असताना आम्ही उत्तम पर्यावरणासाठी ‘क्लायमेट चेंज ऍक्शन प्लॅन’ हाती घेतला होता. मुंबईसह पुणे, सोलापूर आदी शहरांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार होता.
– मात्र हे पर्यावरणपूरक उपक्रम आताच्या सरकारने ठप्प ठेवलेले दिसून येत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. शिवाय ‘मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन’, ‘एमसीसीसी’, इलेक्ट्रिक वाहन पॉलिसी, धूळ नियंत्रण धोरणही सरकारने बाजूला ठेवल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

कोणत्याही शहराचा एअर क्कालिटी इंडेक्स (एक्यूआय) उत्तम असणे हे दर्जेदार जीवन जगण्यासाठी आणि काम करण्यासाठी अनिवार्य असतो. मात्र दुर्दैवाने केवळ राजकारणासाठी बेकायदेशीर सरकार शहरातील प्रदूषणाबाबत ‘ओके’ असल्याचे दिसून येते.
– आदित्य ठाकरे