मनमानी कारभार करणे कमिटीला भोवले, बोरिवलीच्या श्रद्धा हाईट्स सोसायटीवर प्रशासक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोसायटीच्या आवारात बेकायदेशीपणे बांधकाम करणे, लेखापरीक्षणाचा अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे सादर न करणे, सोसायटीमधील व्यावसायिक गाळेधारकांकडून जादा पैसे आकारूनही त्यांना पुरेशा सुविधा न देणे अशा पद्धतीने मनमानी कारभार करणे बोरिवली येथील श्रद्धा हाईट्स को-ऑप. हौसिंग सोसायटीला भोवले आहे. या सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांसह संपूर्ण कमिटी बरखास्त करण्यात आली असून सोसायटीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश उपनिबंधकांनी दिले आहेत.

बोरिवलीच्या एक्सर रोड बाभई नाका येथे श्रद्धा हाईट्स को- ऑप. हौसिंग सोसायटी ही 20 मजली इमारत आहे. या सोसायटीत 68 कुटुंबे आणि नऊ व्यावसायिक गाळेधारक आहेत. सोसायटीच्या कमिटीकडून व्यावसायिक गाळेधारकांकडून लिफ्ट मेंटेनन्स आणि कार पार्ंकगसाठी दुप्पट पैसे आकारले जातात. जादा पैसे आकारूनदेखील व्यावसायिकांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नव्हत्या. दुकान क्रमांक 1/1ए सिंगल युनिट असतानाही सोसायटीकडून दुप्पट सेवा शुल्क आकारणी केली जात होती, असा आरोप जसुभाई वाघानी यांनी केला आहे. कमिटीने पार्किंगच्या जागी बेकायदेशीरपणे सोसायटीचे कार्यालय थाटले तसेच इलेक्ट्रिक केबिनच्या जागेत सुरक्षारक्षकाची राहण्याची व्यवस्था केली. याशिवाय 2020-21 आणि 2021-22 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लेखापरीक्षणाचा अहवाल सभेपुढे सादर केला नव्हता. त्याविरोधात जसुभाई वाघानी यांनी उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.

यासंदर्भातील सुनावणी नुकतीच पूर्ण झाली असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी आर नॉर्थ विभागाचे उपनिबंधक बी. एस. कटरे यांनी  सोसायटीचे अध्यक्ष रमाकांत सावंत, सचिव अजय गांधी यांच्यासह कमिटी बरखास्त करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे कमिटी सदस्यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी घातली आहे. सोसायटीच्या कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी प्रकाश चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश उपनिबंधकांनी दिले.