हल्ल्यानंतर मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी पुन्हा शाळेत हजर, विद्यार्थिनींकडून औक्षण करून स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळा परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत आवाज उठविणारे सामाजिक कार्यकर्ते, मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज कुलकर्णी हे सीताराम सारडा विद्यालयात दाखल झाले. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.

कुलकर्णी यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद नगर जिह्यासह राज्यभरात उमटले होते. याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर आज हेरंब कुलकर्णी पुन्हा शाळेत हजर झाले. यावेळी विद्यार्थिनींनी त्यांना औक्षण केले. शाळेचे चेअरमन मकरंद खेर, निवृत्त मुख्याध्यापिका बोगावत मॅडम, निवृत्त मुख्याध्यापक विलास साठे, भंडारी मॅडम आदी यावेळी उपस्थित होते. हल्ल्याच्या घटनेनंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक यांच्यासह महाराष्ट्रातील माध्यमे, सामाजिक संस्था, कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले, याबद्दल मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले. तसेच यापुढे शाळा परिसरातील अवैध धंदे रोखण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.