
सासूचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच, अवघ्या अर्ध्या तासात सुनेनेदेखील अखेरचा श्वास घेतला. या घटनेने राहुरीत हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुरीतील रहिवाशी मालनबाई पांडुरंग शेजूळ (वय 75) यांना मध्यरात्री शारीरिक त्रास जाणवू लागला. घरातील नातेवाईकांनी त्यांना शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. या पाठोपाठ त्यांची सून मीराबाई भाऊसाहेब शेजूळ (वय 55) यांनाही त्रास जाणवू लागल्याने त्यांनाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. सासू मयत झाल्याची माहिती मिळताच, मीराबाई यांचादेखील हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.


























































