आगरी-कोळी भूमिपुत्र आज ठाण्यात एकवटणार; पोलीस आयुक्तांना देणार निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची निर्घृण हत्या करणाऱया सुत्रधार व मारेकऱयांना अटक करा व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्या या मागणीसाठी कल्याण, भिवंडी, ठाण्यातील आगरी-कोळी भूमिपुत्र उद्या रविवारी सकाळी 10.30 वाजता ठाण्यात एकवटणार आहेत. हे हजारो भूमिपुत्र ठाणे पोलीस आयुक्तालयावर धडक देऊन आयुक्तांना निवेदन देणार आहेत. अशी माहिती समस्त आगरी-कोळी भूमिपुत्र संघटनेने दिली.

पुर्णेकर यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आगरी-कोळी समाजालाही मोठा धक्का बसला आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी व आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात आगरी सेना महाराष्ट्र, 27 गाव संघर्ष समिती, नवी मुंबई विमानतळ संघर्ष समिती, शेतकरी संघटना अंजूर-दिवे, आगरी-कोळी उत्कर्ष मंडळ कल्याण या संघटना सहभागी होणार आहेत.