
राज्य सरकारच्या वतीने गरजू, बेघर, स्थलांतरित कामगार यांच्यासाठी ‘शिवभोजन’ योजना सुरू केली आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यात 41 ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू असून, आता या ठिकाणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सीसीटीव्ही बसविणे सक्तीचे केले आहे. यासाठी 31 जानेवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती मुदत संपली असून, आता जिल्हा पुरवठा विभाग जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांतील सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी करणार आहे.
राज्यातील प्रत्येक शिवभोजन केंद्रांत मानांकनानुसार सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेश डिसेंबर 2021मध्ये देण्यात आले होते. यासाठी 31 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. शिवभोजन केंद्रांत बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या कक्षेत केंद्राची सर्व जागा व्यापेल अशा पद्धतीने बसविणे, मागील किमान दोन दिवसांच्या ‘शिवभोजन’ आहारवाटपाचे प्रक्षेपण तपासणीसाठी उपलब्ध करून देणे, वीजपुरवठा खंडित होण्याच्या शक्यता विचारात घेऊन पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्याचे राज्य सरकारचे आदेश शिवभोजन केंद्रचालकांना दिले आहेत.
जिल्ह्यात 4 हजार 900 थाळ्या
नगर शहरात 17 आणि उर्वरित जिल्ह्यात 24 अशी 41 शिवभोजन केंद्रे जिल्ह्यात असून, त्या ठिकाणी चार हजार 900 थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. या ठिकाणी गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने शिवभोजन केंद्रांत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला असून, ते मानांकनानुसार बसविणे आवश्यक आहे. लवकर जिल्ह्यातील केंद्रांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.


























































