
नगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. मात्र, राज्याच्या मुख्य विद्युत विभागाकडून पोलिसांना अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्यामुळे तपासात अडचणी येत आहेत.
दि. 6 नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सरकारने जिल्हा शल्य चिकित्सकांसह सहाजणांवर कारवाई करीत चौकशी समिती नियुक्त केली आहे, तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एक वैद्यकीय अधिकारी, दोन परिचारिका व एक परिचारक यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. दरम्यान, आगप्रकरणी तपास करण्यात पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन चौघांना अटक केली असली तरी यामध्ये खरे गुन्हेगार शोधण्यासाठी चौकशी समिती, विद्युत विभाग यांचे अहवाल पोलिसांच्या हाती येणे आवश्यक आहे. यानंतरच तपासाला गती मिळू शकते आणि खरे गुन्हेगार समोर येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. घटना घडल्यानंतर राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षकांनी अतिदक्षता विभागाला भेट देऊन नोंदी घेतल्या होत्या. याबाबत त्यांनी पोलिसांना अद्याप अहवाल दिला नसल्याने पुढील तपासात अडचणी निर्माण होत आहेत. आगप्रकरणी 100 पेक्षा जास्त व्यक्तींचे जाबाब नोंदविले जाणार आहेत. घटनेवेळी रुग्णालयात हजर असलेले डॉक्टर, कर्मचाऱयांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डॉ. पोखरणा यांनी पुरावे सादर केले
जिल्हा रुग्णालयाचे निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना पोलिसांनी नोटीस पाठवून निर्दोषत्वाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. डॉ. पोखरणा यांनी पुरावे सादर केल्याचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले. तपासासाठी विद्युत विभागाचा अहवाल आवश्यक असून, तो मिळण्याची वाट पाहत असल्याचे मिटके यांनी सांगितले.

























































