कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन केंद्रप्रमुखांसह चार शिक्षक निलंबित; नगर जिल्ह्यात कारवाई; सीईओ येरेकर यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलींशी गैरवर्तन, डमी शिक्षकांची नेमणूक करणे आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सहा शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, त्यांना निलंबित केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांनी सहाजणांवर निलंबनाची कारवाई केली. निलंबितांमध्ये दोन केंद्रप्रमुखांसह चार उपाध्यापकांचा समावेश आहे.

उपाध्यापक रमेश शिवाजी आहेर (कारेवाडी, संगमनेर), प्रभाकर सखाराम रोकडे (जवळे बाळेश्वर, संगमनेर), उपाध्यापक मदन रंगनाथ दिवे (ता. राहुरी), पारनेरचे केंद्रप्रमुख अविनाश गुलाबराव गांगर्डे, उपाध्यापक बाजीराव शंकर पानमंद (जि. प. शाळा, मांजरधाव, हिवरे कोरडा, पारनेर) व मुख्याध्यापक पोपट दगडू फापाळे (पाडळी दर्या, पारनेर) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

कारवाई करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये पारनेर तालुक्यातील हिवरेकोरडा येथील मांजरधाव प्राथमिक शाळेतील शिक्षक बाजीराव शंकर पानमंद याने स्वतःच्या जागेवर खासगी बेरोजगार डी.एड. शिक्षकाची नेमणूक करून पगार घेतल्याचे समोर आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. आता त्याला निलंबित करण्यात आले असून, त्याचे मुख्यालय आता अकोले केले आहे. पारनेर पंचायत समितीमधील केंद्रप्रमुख अविनाश गुलाब गांगर्डे यांच्यावर ठपका ठेवून त्यांचे निलंबन केले आहे. तसेच, त्याला मुख्यालय अकोले देण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यातील कारेगाव येथील झेडपीच्या शाळेत रमेश शिवाजी आहेर यांनी बेरोजगार शिक्षकांची परस्पर नेमणूक करत त्यांच्याकडून अध्यापन करून घेतले होते. याबाबत थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार आली असता, तपासणीनंतर आहेर याला निलंबित करण्यात आले असून, त्याला मुख्यालय जामखेड दिले आहे. शाळेत मुलींची छेडछाड प्रकरणी शिक्षक मदन दिवे याच्यावर ठपका ठेवला होता. दिवे याला निलंबित केले असून, त्याला मुख्यालय जामखेड दिले आहे. पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथील शिक्षक पोपट फाफाळे याने वर्गातील मुलींची छेड काढली होती. फाफाळे याला निलंबित करण्यात आले असून, त्याला मुख्यालय अकोले देण्यात आले आहे. संगमनेरमधील जवळे बाळेश्वर येथील केंद्रप्रमुख प्रभाकर रोकडे यांनी पर्यवेक्षीय कामात हलगर्जीपणा केला होता. रोकडे यांना निलंबित करण्यात आले असून, त्याला मुख्यालय जामखेड दिले आहे.