नगर – कोजागरी पौर्णिमेला भजन करणे पडले महागात, अकोळनेर गावात 44 जणांना कोरोनाची बाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोजागरी पौर्णिमेनिमित्त भजनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहिल्याचा फटका अकोळनेर (ता. नगर) येथील अनेक लोकांना बसला आहे. गावातील 44 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, इतर 128 अहवाल येणे बाकी आहे. आज पुन्हा या गावात अँण्टिजेन तपासणी करण्यात येणार आहे.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त अकोळनेर गावात भजनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी गावातील वृद्ध मंडळींची संख्या मोठी होती. गेल्या तीन दिवसांत काही लोकांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने काल अनेकांची तपासणी करण्यात आली. कोरोनाचा फैलाव झाल्याने ऐन दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर गावातील लोक बाहेर जाणार नाहीत, तसेच बाहेरील लोकही गावात येऊ नये, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

अकोळनेर हे नगर शहरापासून जवळच आहे. एका लहान गावात मोठय़ा संख्येने रुग्ण आढळल्याने पंचक्रोशीतील गावांनीही धास्ती घेतली आहे. नगर शहरातही कोरोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

अकोळनेरमध्ये सध्या सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. आज गावात पुन्हा सर्व लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. कालच्या तपासणीत 44 रुग्ण आढळले. अजून 128 लोकांचा अहवाल येणे बाकी असून, आज दिवसभरात गावातील सर्वच लोकांची तपासणी करण्याचे नियोजन आहे.
– सविता मेहेत्रे, सरपंच.

जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार

नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत असतानाच काल अचानक वाढलेले रुग्ण आता जिल्ह्याची डोकेदुखी ठरणार आहेत. याबरोबरच संगमनेरमध्येही रुग्ण वाढू लागल्याचे दिसून येत आहे.

दीपावलीच्या खरेदीनिमित्त लोक बाहेर पडत असून, बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. अनेकजण तोंडाला मास्क लावत नाहीत. लग्न, साखरपुडा आदी कार्यक्रमांतही नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात 215 नवे कोरोनाबाधित

नगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत 215 ने वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या 58 हजार 40 वर पोहोचली आहे. रविवारी 149 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आजवर 55 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.96 टक्के इतके झाले आहे.

मृतांची एकूण संख्या 888 झाली असून, सध्या 1 हजार 458 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील- 40, नगर ग्रामीण- 19, संगमनेर – 18, पाथर्डी- 17, शेवगाव-10, राहता-9, नेवासा-7, पारनेर, जामखेड आणि अकोले प्रत्येकी 6, कर्जत- 4, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर आणि राहुरीत प्रत्येकी 2 आणि कोपरगावातील एका रुग्णाचा समावेश आहे.