नगरच्या पासपोर्ट कार्यालयाने आठ महिन्यांत काढले 7 हजार 753 पासपोर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर 

पासपोर्ट काढायचे म्हटले की नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागायचे. वेळ व पैशांबरोबरच एजंटांच्या चुकांचाही मनस्ताप सहन करावा लागायचा. पासपोर्टसाठी नगरकरांना कायमच पुण्याला जावे लागायचे. नगरमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यामुळे मात्र नागरिकांची या त्रासातून सुटका झाली आहे. नगरमध्येच झटपट पासपोर्ट मिळू लागल्याने यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

पासपोर्ट केंद्र सुरू झाल्यापासून आठ महिन्यांत तब्बल 7 हजार 753 पासपोर्ट काढण्यात आले आहेत; तसेच रोजच्या 50 ऑनलाइन नोंदणीत वाढ करून शंभर करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन नोंदणी केलेले शंभर अर्ज या कार्यालयातून रोज सबमिट केले जातात.

नगर जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पूर्वी पुण्याला जावे लागत होते. त्यामुळे वेळ व पैसा खर्च होत होता; तसेच पासपोर्टच्या किचकट प्रक्रियेमुळेही मनस्ताप व्हायचा. आता मात्र नगरमध्येच पासपोर्ट केंद्र एप्रिल 2018 मध्ये सुरू करण्यात आले. येथेच अर्ज भरून पासपोर्ट मिळत असल्याने नागरिकांचा त्रास कमी झाला आहे. पासपोर्टसाठी अर्ज करताना पासपोर्टचे शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा आहे. त्यानंतर कागदपत्र व व्यक्तींची पडताळणी करण्यासाठी कार्यालयात उपस्थित रहावे लागते. नगरमध्ये केंद्र सुरू झाले, त्यावेळी सुरुवातीच्या टप्प्यात साधारण 50 अर्जांची पडताळणी होत होती; परंतु नागरिकांचा प्रतिसाद वाढल्याने रोज शंभर अर्ज पडताळणी होऊन पुढील प्रक्रियेसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले जात आहेत. त्यानंतर पासपोर्टची पुढील आवश्यक कार्यवाही झाल्यानंतर साधारण महिनाभरानंतर पासपोर्ट मिळत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टसाठी लागणारी कागदपत्रे कमी केल्याने लोकांचा प्रतिसाद वाढला आहे. पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये वापरण्यात येणार्‍या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे तपासणीचा कालावधी घटला आहे. परिणामी पासपोर्टसाठी अपॉइंमेंट ते पोलिस व्हेरिफेकशनची प्रकिया सुटसुटीत झाली आहे.