नगर – महसूल वसुली 37 टक्क्यांवर, सात महिन्यात 50 कोटी 71 लाख महसूल जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

नगर जिल्हा महसूल विभागाची ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत 50 कोटी 71 लाख म्हणजेच 37 टक्के महसूल वसुली झाली आहे. यंदा प्रशासनाला 137 कोटी 26 लाख 72 हजार रुपये महसूल वसुलीचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे आता पुढील पाच महिन्यांमध्ये जवळपास 87 कोटींच्या महसूल वसुलीचे (63 टक्के) आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.

यंदाचे आर्थिक वर्ष सुरू झाले, तेव्हा लोकसभेची निवडणूक सुरू होती. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मे महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता संपली, तर राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात सुरू झाली. ऑक्टोबर महिन्यात या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ती संपली. मात्र, लागोपाठ आलेल्या निवडणूक कार्यक्रमांमुळे जिल्हा प्रशासन त्यात अडकून पडले. त्याचा परिणाम महसूल वसुलीवर झाल्याचे दिसत आहे. यंदा जमीन महसुलापोटी मार्च-2020 अखेर 45 कोटी 26 लाख 72 हजार व गौण खनिजाच्या वसुलीपोटी 92 कोटी, असे एकूण 137 कोटी 26 लाख 72 हजार रुपये वसुलीचे उद्दीष्ट प्रशासनापुढे आहे. त्यापैकी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस जमीन महसूल वसुलीपोटी 12 कोटी 60 लाख 46 हजार वसुली झाली आहे. तर गौण खनिजाच्या वसुलीपोटी 38 कोटी 10 लाख 78 हजार रुपयांची वसुली झाली आहे.

ऑक्टोबरअखेर जमीन महसूल वसुलीची टक्केवारी 27.84 टक्के व गौण खनिज वसुलीची टक्केवारी 41.42 टक्के आहे. आता उर्वरित सहा महिन्यांत जमीन महसुलातून 33 कोटींच्या व गौण खनिजाच्या माध्यमातून 54 कोटींच्या वसुलीचे (59 टक्के) आव्हान जिल्हा प्रशासनापुढे उभे आहे.