
टाटा समूहाच्या एअर इंडियाने विमान उत्पादक एअरबस आणि बोईंग कंपन्यांसोबत जम्बो डील केले असून तब्बल 840 विमानांची खरेदी एअर इंडिया करणार आहे. 85 अब्ज डॉलर्सचा हा व्यवहार असेल, असे पंपनीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी निपुण अग्रवाल यांनी सांगितले.
एअर इंडियाने एअरबसकडे 250 आणि बोईंगला 220 विमानांची ऑर्डर दिल्याची माहिती याआधी पुढे आली होती. मात्र त्यात आणखी 370 विमाने खरेदी करण्याचा पर्याय समाविष्ट आहे, असे सांगण्यात आले.
एअर इंडियाची ही ऑर्डर विमान उद्योगाच्या इतिहासातील सर्वात मोठी मानली जाते. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन या दोघांनीही या ऑर्डरचे स्वागत केले आहे. एअर इंडियाने गेल्या 17 वर्षांनंतर प्रथमच विमान खरेदीची ऑर्डर दिली आहे. याआधी एअर इंडियाने 111 विमाने खरेदीची ऑर्डर दिली होती.






















































