
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना, संशोधन सुरू आहे. आता चक्क रोबो तुम्हाला विमानातील इंटेरिअरची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. एअर इंडिया एक्प्रेसने नुकताच अल्ट्राव्हायलेट रोबोटिक डिव्हाईस लाँच केला आहे. या टेक्नोलॉजीचा वापर करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे.
विमानातील आसन, आसनांखालील भाग, कॉकपिट इन्स्ट्रुमेंटल एरिया, विंडो पॅनल, ओव्हरहेड लगेज कंपार्टमेंट अशा विविध ठिकाणांच्या निर्जंतुकीकरणासाठी हा रोबो उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा विमानप्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. निर्जंतुकीकरणासाठी या रोबोला यूव्ही डिसइन्फेक्शन लॅम्पिंग सिस्टम जोडले आहे.
लवकरच अन्य विमानतळांकर सेवा
याबाबत एअर इंडिया एक्सप्रेसचे अधिकारी म्हणाले, विमानांच्या इंटेरिअरच्या साफसफाई आणि निर्जंतुकीकरणासाठी रोबोचा वापर करणारी आमची कंपनी पहिली ठरली आहे. दिल्ली विमानतळावर बोईंग 737-800 या विमानांच्या निर्जंतुकीकरणासाठी या डिव्हाईसचा वापर करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास लवकरच कंपनीतर्फे अन्य विमानतळांवरदेखील ही सुविधा दिली जाणार आहे.































































