
हिंदुस्थानी कसोटी संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे पुन्हा आपल्या फॉर्मात परतला आहे. मागील काही काळापासून अजिंक्य मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत होता, पण आता त्याने रणजी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकले. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात रहाणेने संयमी खेळी करत आणि मुंबईच्या डावाला आधार देत शतक ठोकले. मोटेरावर रहाणेच्या बॅटने पुन्हा धावांचा पाऊस पाडला
काही दिवसांपूर्वी रहाणेकडून टीम इंडियाच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले. त्याला कसोटी संघातून वगळण्याचीही चर्चा आहे, मात्र यादरम्यान त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक ठोकून निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले आहे. अजिंक्य यावेळी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे. त्याला एक कोटीमध्ये केकेआरने आपल्या संघात स्थान दिले.
मोटेरावर अजिंक्यला सूर गवसला
रहाणेने मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शानदार शतक झळकावले. त्याने आपल्या नाबाद 108 धावांच्या शतकी खेळीत 14 चौकार आणि 2 षटकार ठोकले आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 36 वे शतक पूर्ण केले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील अजिंक्य रहाणेचे हे 24 वे शतक आहे. रहाणे सौराष्ट्रविरुद्ध मुंबईसाठी फलंदाजीसाठी आला तेव्हा संघाची धावसंख्या 2 बाद 22 धावा होती. कर्णधार पृथ्वी शॉ 1 धावा करून बाद झाला तर गोमेल 8 धावांवर बाद झाला. यानंतर रहाणेने प्रथम एस. एम. यादवच्या साथीने डावाची धुरा सांभाळली, मात्र यादव 19 धावांवर बाद झाला, मात्र रहाणेला सरफराज खानने साथ दिली.
सरफराज खानचेही नाबाद शतक
रहाणेसोबत मुंबईच्या डावाला आकार देणाऱया सरफराज खाननेही पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 121 धावांची धडाकेबाज शतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 15 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.अजिंक्य-सरफराज जोडीने चौथ्या विकेटसाठी 219 धावांची नाबाद द्विशतकी भागीदारी साकारली. त्यामुळेच पहिल्या दिवसाखेर मुंबईला 3 बाद 263 अशी दमदार मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई ः पहिला डाव 87 षटकांत 3 बाद 263 (अजिंक्य रहाणे नाबाद 108, सरफराज खान नाबाद 121; जयदेव उनाडकट 23 धावांत 1, चेतन साकारिया 38 धावांत 1 आणि चिराग जानी 43 धावांत 1 विकेट).




























































