
एखाद्या माणसाकडून चूक झाल्यास त्याबाबत दिलगिरी, माफी मागणे गरजेचे आहे. ती आपली संस्कृती आहे. पण इथे तसे घडताना दिसत नाही. कधी राज्यपाल बोलतात, तर कधी एखादा मंत्री, आमदार महापुरुषांबाबत बेताल वक्तव्ये करतात. हे कशामुळे सुरू आहे. यामागचा मास्टरमाइंड कोण आहे? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. महाराष्ट्राच्या मातीला फुटीचा शाप असला तरी जेव्हा संकट येते तेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा होतो, पेटून उठतो याचीच साक्ष देणारा हा मोर्चा असल्याचेही अजित पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अडीच वर्षे राज्यात यशस्वी काम केले. यापूर्वीदेखील अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु शिंदे-फडणवीस यांच्याच काळात राज्याच्या सीमा भागातील अनेक गावांना आम्हाला कर्नाटकात, तेलंगणा किंवा गुजरातमध्ये जायचे आहे अशी भावना वाटू लागावी, याची चौकशी व्हायला हवी. मराठी भाषिकांवर, त्यांच्या वाहनांवर हल्ले होत आहेत. असे असताना हे सरकार कर्नाटक बँकेत खाती काढण्यासाठी ‘जीआर’ काढतात, अशी टीका करत अजित पवार यांनी येणाऱया अधिवेशनात आपण आवाज उठवणार असल्याचे सांगितले. महापुरुषांवर यापुढे कोणीही बेताल वक्तव्ये करू नयेत यासाठी सरकारने कायदा करावा, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न हाणून पाडू – नाना पटोले
इतर राज्यांत जाण्यासाठी सीमा भागांत कधी नव्हे ते प्रयत्न सुरू केले जात आहेत. हे वातावरण तयार करून अखंड महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडू, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.
राज्यपाल भवनातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या महापुरुषांच्या अपमानाची सुरुवात केली. त्यापाठोपाठ भाजपच्या राज्यातील तसेच केंद्रातील नेत्यांनी हाच बेशरमपणा केला. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा सर्वांसमोर आला असून जनताच त्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.



























































