सिंचनदादा जिंकले, चंपादादा हरले! अजित पवार पुण्याचे पालकमंत्री

मिंधे सरकारने 12 जिह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी आज जाहीर केली. त्यात सिंचनदादांनी चंपादादांवर बाजी मारली. चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करून तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्णी लावण्यात आली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून मात्र मिंधे सरकारमध्ये धुसफूस कायम आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पदाची ही सुधारित यादी जाहीर केली. पुणे जिह्याचे पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावे यासाठी अजित पवार अडून राहिले होते, परंतु तिथे चंद्रकांत पाटील असल्याने काय करावे असा प्रश्न मिंधे सरकारला पडला होता. अखेर आज पुण्याचे पालकमंत्री पद अजितदादांकडे सोपवण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावतीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अजितदादांची इच्छा मिंधे सरकारने पूर्ण केली असली तरी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी धुसफूस सुरूच आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. भाजपचे गिरीश महाजन यांनीही नाशिकची मागणी केली आहे, परंतु दोघांचीही मागणी अद्याप मान्य करण्यात आलेली नाही. सध्या दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत.

नाशिकप्रमाणेच रायगड आणि सातारा जिह्याच्या पालकमंत्री पदावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत. शिंदे यांना नाशिकमध्ये भुसेच हवे आहेत आणि रायगडचे पालकमंत्रीपद त्यांनी आपल्या गटातील भरत गोगावले यांच्यासाठी मागितले आहे, परंतु फडणवीस यांना ते मान्य नाही. त्यांची नाशिकमध्ये महाजन तर रायगडमध्ये अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना पसंती आहे. सातारा जिह्याच्या पालकमंत्री पदावरही मिंधे गटाने दावा सांगितला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारानंतरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

पालकमंत्र्यांची सुधारित यादी

  •  पुणे – अजित पवार
  •  अकोला – राधाकृष्ण विखे-पाटील
  •  सोलापूर – चंद्रकांत पाटील
  •  अमरावती – चंद्रकांत पाटील
  •  वर्धा – सुधीर मुनगंटीवार
  •  भंडारा – विजयकुमार गावीत
  •  बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
  •  कोल्हापूर – हसन मुश्रीफ
  •  गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
  •  बीड – धनंजय मुंडे
  •  परभणी – संजय बनसोडे
  •  नंदुरबार – अनिल भा. पाटील