
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सातत्याने अजित पवार गटावर टीका करतात. मात्र, आता त्यांनी अजित पवार यांचे नाव घेत थेट फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्या मतदारसंघातील कामाला निधी देण्यात येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांचा उल्लेख करत रोहित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार गटाच्या 9 आमदारांना मंत्रीपद देण्यात आले. तसेच अजित पवार यांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद मिळाले आहे. तसेच नुकतेच त्यांना पुण्याचे पालकमंत्री पदही देण्यात आले आहे. त्यामुळे राजकारणात अजित पवार यांचा दबदबा वाढत आहे. तसेच आमदार रोहित पवार सातत्याने भाजप आणि अजित पवार गटावर निशाणा साधतात. मात्र, अनेकदा अजित पवारांवर बोलण्याचे, थेट टीका करण्याचे ते टाळतात. आता, पुन्हा एकदा त्यांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका करणे टाळले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे.
माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचं काम अर्धवट होऊन निधीअभावी ठप्प झालंय.. अर्थमंत्री अजितदादा आहेत, मात्र या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असलेल्या मा.… pic.twitter.com/sZn1QDojWN
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 22, 2023
माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचे काम अर्धवट होऊन निधीअभावी ठप्प झाले आहे. अर्थमंत्री अजितदादा आहेत, मात्र या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असलेल्या अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार असून तो योग्य वाटत नाही. दुसरे म्हणजे उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का?, असा सवालही रोहित पवार यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.
राजकारण तर आपण नेहमीच एकमेकांच्या विरोधात करतो. पण, ते विचारांचे आणि तत्त्वांचे असावे. राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये, हे आपल्यासारख्या मोठ्या नेत्याला सांगण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच, हे शेअर केलेले फोटो बघितले तर इतके काम होऊनही 1 रुपयाही निधी दिलेला नाही आणि अशीच अवस्था राज्यातील इतर 26 कामांचीही आहे. मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटतं का?, असा प्रश्न रोहित पवार यांनी फडणवीसांना उद्देशून केला आहे.


























































