
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढला असून केंद्राने राज्यांना यासंदर्भात सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला विधानसभेच्या सभागृहात काही अत्यंत महत्त्वाचा सूचना केल्या.
सभागृहात बोलताना अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली. ‘गेल्या तीन वर्षांपासून कोविड 19 नं थैमान मांडलं होतं. त्यावर सर्वांनी प्रयत्न करून नियंत्रण आणलं. मात्र अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळतात. चीन अमेरिकेत नवीन व्हेरिएंट आला आहे. चीनमध्ये अनेक भागात लॉकडाऊन केलं आहे. तिथे रुग्णालये कमी पडत असल्यानं गाड्यांमध्ये रुग्णांना ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता चीन मधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हायपॉवर कमिटी, टास्क फोर्स किंवा जगभरात काय केलं जात आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहे का? कोविडच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून पक्ष बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन विशेष काळजी घेणं आवश्यक आहे का? बाकी यंत्रणा तात्काळ कुठली कुठली उभी करायची याचा अनुभव त्यावेळच्या प्रशासनाला आहे आणि सरकारला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात कोरोनातून लोकांना कसं वाचवता येईल हा प्रयत्न आपण केला. आपण जम्बो सेंटरही उभारले. अर्थमंत्रालय माझ्याकडे होतं तेव्हा कुठल्याही परिस्थित अशा कामाला आपण निधी कमी पडू दिलेला नाही. हा विषय तातडिचा मला वाटतो आहे कारण कोरोना वाढला की मग विमानसेवा थांबवावी लागतात. अख्खा देश काही दिवसांकरिता लॉकडाऊनमध्ये होता. या विसर कृपा करून पडता कामा नये. सरकारने याची काळजी घ्यावी’, अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे.
अजित पवार यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला असल्याचं सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारची भूमिका मांडली. ‘यासंदर्भात केंद्राशी समन्वय करता येईल आणि विरोधी पक्षनेत्यांनी सूचवल्या प्रमाणे एखादी समिती किंवा टास्क फोर्स आपण गठीत करू जो बदलत्या परिस्थिवर नजर ठेवून आपल्याला वेळोवेळी सूचना करेल आणि त्याची अंमलबजावणी निश्चित करू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिलं.



























































