
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एका व्यक्तीने 2 डिसेंबर रोजी फोन करून ही धमकी दिल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी ग्रामदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे. शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती बाहेरच्या राज्यातील आहे. ती विकृत आहे की त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, याची चौकशी करण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत. परंतु फोनवर ती व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती आणि अतिशय वाईट शब्द वापरत होती. दिवाळीत हे फार चालू होते. तेव्हा तक्रार केल्यानंतर ही व्यक्ती सापडली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
रोहित पवारांचे धक्कातंत्र, बेळगावात पोहचत घातले जोतिबाला साकडं
दरम्यान, शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या फोनवर एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्या व्यक्तीने शरद पवार यांना गावठी कट्ट्याने मारणार असल्याची धमकी दिली. पोलिसांच्या फोन ऑपरेटरने पोलिसांकडे यासंबंधित तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
























































