
सामना प्रतिनिधी । मुंबई
वाराणसी येथे झालेल्या उत्तर प्रदेश कॅरम असोसिएशन व वाराणसी कॅरम असोसिएशनच्या यजमानपदाखाली अखिल हिंदुस्थानी कॅरम महासंघ आयोजित सब ज्युनिअर राष्ट्रीय व आंतर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या 14 वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या आकांक्षा कदमने तामीळनाडूच्या आर. मोनिशाचा 21-0, 12-10 सहज असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसर्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तामीळनाडूच्या एम. खाजिमाने तामीळनाडूच्याच एस. अस्विकाचा 9-03, 11-21, 21-4 असा विजय संपादन केला. 14 वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात तामीळनाडूच्या एन. मिथुनने उत्तर प्रदेशच्या मोईनुद्दीनचा 15-1, 14-10 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजयावर शिक्कामोर्तब केले.




























































