साखर व धनादेशचोरीचे आरोप बिनबुडाचे, बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – मेघराज राजेभोसले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर व माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयातील साखर आणि धनादेश चोरीचे केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. तसेच या बदनामी प्रकरणी या दोघांसह बदनामी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संजय डूबे, रवींद्र गावडे, शरद चव्हाण, प्रशासन अधिकारी अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, माजी उपाध्यक्ष सुरेखा शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या येथील कार्यालयातील सदस्यांना वितरित करण्यात येणारी साखर व कार्यालयातील धनादेश चोरी झाल्याचा आरोप महामंडळाचेच उपाध्यक्ष धनाजी यमकर व माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. त्याला आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह संचालक व कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.

आगामी पंचवार्षिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्यावर व महामंडळावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी महामंडळाच्या कार्यालयातील एका महिला कर्मचार्‍यासोबत असभ्य वर्तन केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत.

तसेच त्यांनी स्वीकृत संचालक रवींद्र गावडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे गंभीर आरोप मेघराज भोसले यांनी यावेळी केले. तसेच महामंडळाची बदनामी केल्या -प्रकरणी यमकर यांच्यासह चुकीचे आरोप करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, चित्रनगरी आणि शालीनी सिनेस्टोन विकासाबाबत गेले साडेचार वर्ष पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.