अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून अमृता नरसाळे यांची निवड

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे यावर्षी 2 ते 4 फेब्रुवारी रोजी मराठी वाङमय मंडळाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रत्नागिरी येथील कवयित्री अमृता विजय नरसाळे यांना मान्यवरांच्या कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून जाण्याचा मान मिळाला आहे.

अमृता नरसाळे यांचा ‘काही स्वप्नांचं असंच असतं’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला असून ‘पारिजात’ या प्रायोगिक चित्रपटाचे गीतलेखन देखील त्यांनी केलेले आहे. आकाशवाणी रत्नागिरी व मुंबई केंद्रावरून त्यांच्या अनेक कवितांचे प्रसारण झालेले आहे. तसेच प्रथितयश अशा एका वर्तमानपत्रात साप्ताहिक स्थंभलेख लेखिका म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे.

कोकण विभागातून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रतिनिधी पदी ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांची निवड झाल्यानंतर कोकण विभागातून अनेक कवी आणि लेखकांना अ.भा. म. साहित्य संमेलनात प्रतिनिधित्व करता आले आहे. यावर्षी कोकणातील पूज्य साने गुरुजींच्या अमळनेर या कर्मभूमीत संपन्न होत असलेल्या साहित्य संमेलनात अमृता नरसाळे सहभागी होत आहेत. त्यांच्या निवडीने कोकणातील साहित्यिक परिवारात आनंद व्यक्त होत आहे.