मायावतींचा आदराने उल्लेख न केल्याने अखिलेश यादव भडकले

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत एका आमदाराची चांगलीच कानउघडणी केली. हा आमदार मायावतींबाबत बोलत असताना अखिलेश यांनी त्याला रोखले आणि म्हणाले, मायावती वरिष्ठ नेत्या आहेत आणि वयानेही मोठ्या आहेत. त्यांचे नाव सन्मानाने घ्यायला हवे.

सोमवारी अखिलेश यांनी लखनऊ येथील पक्ष कार्यालयात समाजवादी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सपाच्या काही जागांवर उमेदवारांची नावंही ठरली. पक्ष मकरसंक्रातीच्या आसपास पहिली यादी जारी करेल असे या बैठकीनंतर सांगण्यात येत आहे. अखिलेश यादव यांनी मागच्या दोन दिवसात जिल्हाध्यक्ष आणि आमदारांकडून एका बंद पाकिटात सूचनाही मागवल्या होत्या. या सूचनांवरही या बैठकीत चर्चा झाली.  उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष यांच्यातील जवळीक वाढली असून समाजवादी पक्षासाठी हा चिंतेचा विषय आहे. ऐनवेळी काँग्रेसमुळे आपले गणित बिघडू नये यासाठी समाजवादी पक्ष तयारी करत आहे. निवडणुकांची आतापासूनच पूर्ण तयारी करावी आणि संभाव्य उमेदवारांची नावेही निश्चित करावीत आणि नंतर, जेव्हा केव्हा युतीसाठी जागा सोडण्याची गरज भासेल तेव्हा पक्ष आपले उमेदवार समाजवादी पक्ष मागे घेऊ शकेल अशी रणनिती पक्षाने ठरवली आहे.  अखिलेश यादव यांनी मंगळवारी आपल्या आमदार आणि माजी आमदारांना यापूर्वी मिळालेल्या मतांपेक्षा सपा उमेदवाराला जास्त मते मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले.