
ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावातील डोंगर कपारीत उभारण्यात आलेल्या अक्कादेवी धरणाला सध्या गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तरी उरण तहसील, रायगड जिल्हा परिषद,उरण पंचायत समितीने सदर धरणाची पाहणी करण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी चिरनेर गावातील रहिवासी करत आहेत.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात डोंगर कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले चिरनेर हे गाव आहे.या गाव परिसरातील शेतकऱ्यांनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात 1930 साली महात्मा गांधींच्या हाकेला हाक देत शांततेच्या मार्गाने सत्याग्रह झाला होता त्या ठिकाणी हे लहानसा बंधारा आहे. या धरणातील पाण्याचा फायदा हा येथील आदिवासी बांधवाना शेतीसाठी तसेच गुरे ढोरे याना मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र गेले कित्येक वर्षे या धरणाला गळती लागली असल्यामुळे या पाण्याचा उपयोग येथिल लोकांना होत नाही. गळतीमुळे डिसेंबर अखेरीस हा बंधारा आटतो त्यामुळे जल सिंचन पण होत नाही आणि हे पाणी शेतीसाठी पण वापरता येत नाही. त्यामुळे या बंधाऱ्याची तात्काळ दुरूस्ती करून गळती थांबवावी अशी मागणी नागरीकांकडून करण्यात येत आहे.
चिरनेर गावचे सरपंच संतोष चिर्लेकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी गळतीच्या ठिकाणांची पाहणी केली आहे.तसेच गळती संदर्भात संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत स्तरावरून पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.


























































