
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
हिंदुस्थानी नागरिकांना बुद्धी कमी असते. हे लोक मूर्ख असतात. येथील रिक्षावाले तर एखाद्या भिकाऱयाप्रमाणे परदेशी नागरिकाला गराडा घालतात. हिंदुस्थानी नागरिकांविषयीची ही मते आहेत प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट आइन्सटाइन यांची. त्यांच्या या मतांमुळे वंशभेद न मानणारे महान शास्त्रज्ञ या त्यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. आइन्सटाइन यांनी लिहिलेल्या ‘ट्रव्हल डायरी’वर इंग्रजीतील एक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असून या पुस्तकातून आइन्सटाइन हे वंशभेद मानणारे होते असा समज पुढे आला आहे.
ऑक्टोबर १९२२ ते मार्च १९२३ या काळात आइन्सटाइन यांनी आशिया खंडातील विविध देशांमध्ये प्रवास केला. या प्रवासात आलेल्या अनुभवांवर त्यांनी ‘ट्रव्हल डायरी’ लिहिली होती. यामध्ये त्यांनी जगभरातील विविध देशांमधील लोकांवर व त्यांच्या वर्तवणुकीवर भाष्य केले आहे. या डायरीतील एक भाग नुकताच इंग्रजीतून प्रकाशित झाला आहे.
आइन्सटाइन कधीही हिंदुस्थानात आले नव्हते, पण त्यांनी कोलंबोतील हिंदुस्थानी रिक्षाचालकांचा उल्लेख या डायरीत केला आहे. हिंदुस्थानातील रिक्षाचालक हे एखाद्या भिकाऱयाप्रमाणे वागतात. एखादा परदेशी नागरिक दिसल्यावर हे भिकारी झुंडीने त्याला घेरतात आणि त्या नागरिकाला जोवर कणव येत नाही तोपर्यंत ते त्याला सोडत नाहीत. ही कला त्यांना चांगलीच अवगत असते, असे आइन्सटाइन यांनी डायरीत लिहून ठेवले आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानी नागरिक त्यांना मूर्ख वाटायचे. येथील लोक जैवशास्त्रदृष्टय़ा हलके असून येथील वातावरणानुसार एखाद्या गोष्टीवर १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ ते लक्ष केंद्रित करू शकत नाही असा निष्कर्षही त्यांनी काढला आहे.
रवींद्रनाथ टागोर हे गुरू
हिंदुस्थानी राष्ट्रगीताचे निर्माते आणि ‘नोबेल’ पुरस्कार विजेते बंगाली साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांचे आइन्सटाइन यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. टागोर यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारात आइन्सटाइन यांनी त्यांना ‘राबी’ म्हणून संबोधले आहे. ‘राबी’ हा हिब्रू भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ शिक्षक किंवा गुरू असा होतो.
आइन्सटाइन यांच्या नजरेतून
चिनी लोकांना खुर्चीवर बसून जेवता येत नाही म्हणून ते मांडी घालून बसतात. श्रीलंकेतील (सिलोन) लोकांबाबत त्यांनी लिहिले आहे की, हे लोक खूपच घाणीत राहतात.






















































