मुंबईतील मशिदींमध्ये भोंगे लावायची परवानगी द्या, पोलीस आयुक्तांना दिले लेखी निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावण्यास आम्हाला परवानगी देण्यात यावी, अशी लेखी मागणी ऑल इंडिया सुन्नी जमाईतुल उलेमा संघटनेने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, मशिदींवरील भोंग्यावरून सद्या गदारोळ सुरू आहे. परंतु सामाजिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य आपल्याला करायचे नाही. सामाजिक सलोखा कायम ठेवायचा आहे, असे आवाहन या संघटनेचे प्रमुख सय्यद मोईनुद्दीन अश्रफ यांनी मुस्लिम समाजाला केले आहे.

सय्यद मोईनुद्दीन अश्रफ ऊर्फ मोईन मियाँ यांनी रविवारी ऊर्सचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात सर्व पक्षीय नेते व सर्व धर्मीय लोक उपस्थित राहिले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनीदेखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी मोईन मियाँ यांनी आयुक्त पांडे यांना मुंबईतील मशिदींवर भोंगे लावण्याची परवानगी द्यावी, असे मागणीपत्र दिले. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना मशिदीवर भोंगे लावण्यासाठी परवानगी देण्यास सांगावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीचे पालन केले जात आहे. आम्हाला कुठलाही वाद घालायचा नाही, असे सांगतानाच मुस्लिम बांधवांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता  कोणत्याही वादात पडू नये. सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन मोईन मियाँ यांनी मुस्लिम समाजाला केले आहे. तसेच हा कार्यक्रम रजा अकादमीचा नव्हता, असेही मोईन मियाँ यांनी स्पष्ट केले आहे.