धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट खेळाडूने केला हा कारनामा

ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर टी-20 मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना जिंकत यजमान संघाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या लढतीत ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिली (Alyssa Healy) हिने दमदार खेळ करत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.

ऑस्ट्रेलियाच्या या 30 वर्षीय खेळाडूने टीम इंडियाचा माजी खेळाडू एम. एस. धोनी (MS Dhoni) याचा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील विक्रम मोडला. या लढतीत हिलीने यष्टीमागे 2 झेल पकडले आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक शिकार करण्याचा विक्रम केला. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये यष्टीमागे 91 शिकार (57 झेल आणि 34 यष्टीचीत) केले आहेत.

हिली हिने न्यूझीलंडची खेळाडू लॉरेन डॉन हीच झेल घेत नवा विक्रम केला. धोनीला मागे सोडत आता हिली हिच्या नावावर यष्टीमागे सर्वाधिक 92 शिकार (42 झेल आणि 50 यष्टीचीत) करण्याचा विक्रम जमा झाला. यासह यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 लढती खेळण्याचा धोनीचा विक्रमही (98) हिली हिने मोडला. हिली हिचा हा 99 वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना होता.

आपली प्रतिक्रिया द्या