समृद्धी महामार्ग हा आता धंद्याचा महामार्ग बनला आहे, अंबादास दानवे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच काल शनिवारी मध्यरात्री भरधाव टेम्पो टॅ्रव्हलर ओव्हरलोडेड ट्रकला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात नाशिकच्या इंदिरानगर भागातील 12 भाविक जागीच ठार झाले तर 23 जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी भेट दिली. सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप यावेळी दानवे यांनी केला.

समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात परिवहन विभागाच्या वाटमारीमुळेच झाल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ‘या मार्गावर गतीने धावणारी वाहने मध्येच अडविणार्‍या आरटीओ अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तर हा अपघात नसून हत्या आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. परिवहन अधिकारी, पोलीस, महामार्ग पोलीस हे रात्री-अपरात्री गाड्या थांबवून चौकशी करतात. त्यात त्यांचा हेतू चांगला दिसत नाही. समृद्धी महामार्गावर जेव्हा वाहने प्रवेश करतात. त्याचवेळी अधिकार्‍यांनी वाहनांची तपासणी केली पाहिजे. वाहनांचा पाठलाग केल्याने असे प्रकार घडतात. ज्या खासगी बसच्या अपघात झाला. त्या बसची आसन क्षमतादेखील परिवहन अधिकार्‍यांनी तपासली पाहिजे होती. अधिकारी केवळ ओव्हर लोड वाहनाच्या मागे लागत असल्याचा आरोप करून या अपघातात दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘इंटरचेंजवरील टोल नाका क्रॉस करून समृद्धी महामार्गाला लागण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन विभागाच्या लोकांनी वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे. रात्री भर महामार्गावर ट्रक आरटीओच्या टीमने थांबवला म्हणून मागून येणारी मिनीबस या ट्रकवर आदळली. हा मानवनिर्मित अपघात आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. समृद्धी महामार्ग हा आता धंद्याचा महामार्ग बनला असून जे आरटीओ अधिकारी त्यावेळी अपघातस्थळी कर्तव्यावर होते, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. अशावेळी भर महामार्गावर गाडी थांबवणं चुकीचं आहे तसं क्षमतेपेक्षा अधिक लोक बसवून नेणेही चुकीचच आहे’ असे ट्विटही दानवे यांनी केले आहे.